19व्या मजल्यावरुन पडून कामगाराचा मृत्यू  

पिंपरी – पिंपरीमध्ये निर्माणीधीन असलेल्या म्हाडाच्या इमारतीच्या 19 व्या मजल्यावरुन तीन कामगार खाली कोसळले. त्यापैकी एका कामगाराचा मृत्यू झाला तर अन्य दोघे जखमी झाले आहेत. क्रेनचे ब्रेक निकामी झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना बुधवारी (दि. 11) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.

राजकुमार अशोक घोसले (24) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. तर बाबुराव यादव आणि करण यादव अशी जखमींची नावे आहेत. राजकुमार हा मूळचा छत्तीसगड येथील असून उदरनिर्वाहासाठी तो कामगारनगरीत आला होता. पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पिंपरीमध्ये म्हाडाच्या इमारतीचे काम सुरू आहे.

अपघातातील तीन कामगार क्रेन वर उभे राहून सेफ्टी बेल्ट वापरून 18 आणि 19 व्या मजल्यावर प्लाष्टरचे काम करत होते. तेव्हा अचानक क्रेनचे ब्रेक निकामी झाले आणि कामगार खाली पडले. यात तिघेही जखमी झाले. त्यांना महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र राजकुमार गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. तर इतर दोघांवर उपचार सुरू आहेत. सेफ्टी बेल्ट असताना कामगार पडलेच कसे? असा प्रश्‍न उपस्थित केला असून चौकशीची मागणी करण्यात आली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.