संगमनेर – संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथे ऊसतोडणी मजूर दीपक विठ्ठल कांबळे (रा. सिल्लोड, चाळीसगाव) हे ऊस तोडत असताना बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. ते या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. हा प्रकार मंगळवारी (दि.3) सकाळी घडला. जखमी कांबळे यांना प्रथम लोणी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर नगरला हलविण्यात आले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दाढ खुर्द शिवारातील प्रवरा उजव्या कालव्यालगत असलेल्या खळी रस्त्यावरील साहेबराव रामजी जोशी यांच्या शेतात मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ऊस तोडणी सुरू होती. यावेळी उसात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने ऊसतोडणी मजूर कांबळे यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात कांबळे यांच्या हाताला व पाठीला जखमा झाल्या.
यावेळी इतर ऊसतोडणी मजुरांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते सुनील जोशी यांनी रुग्णवाहिका बोलावून स्थानिकांच्या मदतीने कांबळे यांना लोणी येथील रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर कांबळे यांना नगर रुग्णालयात हालविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. याप्रसंगी पद्मश्री विखे पाटील कारखान्याचे संचालक शांताराम जोरी, डॉ. विकास जोशी, सतीश वाघमारे, सतीश जोशी उपस्थित होते.