कराड -येथील वाखाण परिसरात भुयारी गटाराच्या पाइपलाइनची साफसफाई करताना पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा जीव गुदमरून ते बेशुद्ध पडल्यानंतर त्यांना तात्काळ कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान यातील एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. तर एक जण बेशुद्ध असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेने पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली. या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांचे नाव अनिरूध्द संजय लाड (रा. सोमवारपेठ कराड) असे आहे.
तर धनाजी चंदनशिवे (रा. बुधवारपेठ, कराड) या बेशुद्ध कर्मचाऱ्यावर उपचार सुरु आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, बुधवारी दि. 14 रोजी कराड पालिका हद्दीतील वाखाण परिसरात भुयारी गटाराच्या पाइपलाइनच्या साफसफाईचे काम सुरु होते.
पालिकेचे काही स्वच्छता कर्मचारी हे काम करत असताना त्यातील दोघे जण जीव गुदमरल्याने बेशुद्ध पडले. ही बाब इतर कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबत तात्काळ पालिका प्रशासनास संपर्क करून घटनेची माहिती दिली. त्यांनतर अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह मुख्याधिकारी रमाकांत डाके व अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून दोघांना बाहेर काढले. त्यावेळी ते बेशुद्ध अवस्थेत होते. त्यांनतर त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णवाहिकेतून मलकापूर येथील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले.