राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाची मागणी
पिंपरी – महाराष्ट्र राज्यामध्ये काम करणारा कामगार यामध्ये संघटित कामगार व असंघटित कामगार सर्वांनाच इंग्रजी भाषा येते किंवा समजते असे नाही. बहुसंख्य ठिकाणी याचा गैरफायदा काही कंपनी व्यवस्थापन घेत, सर्व व्यवहार नोटीस व कामकाज इंग्रजीत करत आहेत. त्यामुळे कामगारांची पिळवणूक रोखण्यासाठी कामगारविषयक कागदपत्रे व व्यवहार मातृभाषेतून सुरु करण्याची मागणी राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष किशोर ढोकले यांनी केली आहे.
कामगार विषयक कोणतेही पत्र किंवा करार, नियुक्ती पत्र तसेच अन्य कामगार विषयक बाबी यामध्ये इंग्रजी भाषेचा वापर केला जातो. त्यामुळे बहुसंख्य कामगार यांना परिपूर्ण पणे संबंधित कागदपत्र यांचा अर्थ समजण्यात अडचण निर्माण होते. त्याचबरोबर कामगार आयुक्त, उपायुक्त कार्यालय येथे कामगार विषयक प्रकरण चालू असताना बहुसंख्य कंपनी व्यवस्थापन इंग्रजी भाषेचा वापर करून पत्र व्यवहार करतात. यामुळे संबंधित प्रकरणामधील कामगार यांना या सर्व कागदपत्र यांचे संपूर्ण अवलोकन होत नाही. यामुळे बऱ्याच कामगारांचे नुकसान होते.
महाराष्ट्राची मातृभाषा मराठी असून शासकीय कामकाजात मराठीचा वापर करण्याचे निर्देश नगरविकास विभागाने यापूर्वीच दिले आहेत. मात्र कामगार विभाग या आदेशाचे पालन करत नसल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे याप्रकरणात विशेष लक्ष घालून, कामगारविषयक कामकाजात मातृभाषेचा वापर करण्याची मागणी ढोकले यांनी केली आहे.
कामगार विषयक सर्व कागदपत्रे व पत्रव्यवहार मराठीमध्ये केल्यास बहुसंख्य कामगारांचे होणारे नुकसान थांबविले जाईल. यावरती शासनाने विचार करणे गरजेचे आहे, अशी मागणी संघटनेच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली आहे.