वारूळवाडी बाह्यवळण पुलाचे काम त्वरीत करा

शिवाजीराव आढळराव ः नारायणगाव-शिरूर मार्गावरील कामाची केली पाहणी

नारायणगाव- नारायणगाव बाह्यवळणास जोडणाऱ्या शिरूर-रांजणगाव राज्य मार्गावर वारुळवाडी हद्दीमध्ये शिवसेना उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रयत्नांमुळे मोठ्या पुलाचे काम सुरू झाल्याने शुक्रवारी (दि. 13) त्यांनी या ठिकाणास भेट देऊन काम जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत नारायणगाव (ता. जुन्नर) येथील बाह्यवळण कामाचे सर्व्हेक्षण व अंदाजपत्रक करतेवेळी नारायणगाव-शिरूर मार्गावरील मांजरवाडीसह, हिवरे तर्फे नारायणगाव आणि अनेक गावांतील ग्रामस्थांनी शिवसेना तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांच्या माध्यमातून खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडे सुमारे दीड वर्षापूर्वी मागणी केली होती.

राष्ट्रीय महामार्गाकडून या कामाचे अंदाजपत्रक करताना आता होणाऱ्या पुलाच्या जागेपर्यंत रस्ता खंडीत करण्यात आला होता. ही चूक खासदार आढळराव पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या भागास भेट देऊन वारुळवाडी हद्दीत जोडणाऱ्या नारायणगाव बाह्यवळण रस्त्यावर सर्कल ऐवजी व्हेईकल ओव्हरपास (व्हीओपी) करण्यात यावा, अशा सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना केल्या होत्या. त्यानुसार अंदाजपत्रकात बदल करण्यात येऊन सुमारे 4 कोटी रकमेच्या पुलास मंजुरी मिळून हे काम नारायणगाव बाह्यवळण कामात अंतर्भूत करण्यात आले. त्यानुसार येथे चालू असलेल्या कामास शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, शिवसेना तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, रशीद इनामदार, दिलीप वाजगे, रामदास बाळसराफ, उत्तम अडसरे, दर्शन अडसरे, इंद्रभान गायकवाड, डॉ. वायाळ, शब्बीर पठाण आदी ग्रामस्थांनी शुक्रावारी (दि. 13) भेट देऊन काम जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

  • नारायणगाव-शिरूर मार्गावरील बाह्यवळण पुलाचे काम जलदगतीने सुरू असून, या पुलाची एक बाजू दोन महिन्यांत सुरू होईल, अशा पध्दतीनेच कामाचे नियोजन केले जाईल
    – उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग नारायणगाव
  • अष्टविनायकातील प्रमुख जोडरस्ता
    या पूलाचा उपयोग राज्य मार्ग 128 वरील मांजरवाडी, हिवरे तर्फेनारायणगाव, जाधववाडी, रांजणी, थोरांदळे, वळती, भागडी, पारगाव, शिंगवे, पिंपरखेड, तसेच शिरूर तालुक्‍यातील अनेक गावांना व अष्टविनायकातील जोड रस्त्याला होणार असल्याने वाहतुकीचा ताण कमी होऊन भविष्यातील प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.