आगामी निवडणुकीसाठी कॅन्टोन्मेंटकडून तयारी
पुणे – कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागांची फेररचना करण्याचे काम सुरू असून, प्रभाग चार हा अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवला आहे. तर उर्वरित प्रभागांपैकी राखीव महिला प्रभाग 24 डिसेंबरपर्यंत जाहीर करणार असल्याचे बोर्ड प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे नुकतीच विशेष सभा घेण्यात आली. बोर्डाचे अध्यक्ष मेजर जनरल नवनीत कुमार, उपाध्यक्ष विवेक यादव, मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार आणि नगरसेवक उपस्थित होते. या बैठकीत प्रभागांच्या आरक्षणाविषयी चर्चा करण्यात आली. तसेच, सर्वानुमते प्रभाग चार हा अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवला आहे. लष्कर परिसरातील न्यु मोदीखाना आणि धोबीघाट परिसर या प्रभागात समाविष्ट आहे.
याबाबत कुमार म्हणाले, “संरक्षण मालमत्ता विभागाने मागील 15 दिवसांपूर्वी बोर्ड प्रशासनास पत्र पाठवून अनुसूचित जाती आणि महिलांसाठी नवीन वॉर्ड राखीव करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सन 2011 च्या जनगणनेनुसार आणि सन 2007 च्या निवडणूक नियमानुसार ज्या प्रभागात अनुसूचित जातीची लोकसंख्या जास्त असेल तो प्रभाग राखीव करण्यात येतो. ही बाब लक्षात घेतल्यास कॅन्टोन्मेंट भागातील प्रभाग क्रमांक चारमध्ये इतर प्रभागांपेक्षा जास्त संख्या आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक चार हा अनुसूचित जातीसाठी राखीव करण्यात आला असल्याचे सर्वसाधारण सभेत जाहीर करण्यात आला आहे.’
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत महिलांसाठी नवीन प्रभाग राखीव होणार आहेत. त्यासाठीची अधिसूचना निघाली आहे. त्यासाठी रितसर जाहीर नोटीस काढण्यात येणार आहे. त्यानंतर सात दिवसांनी महिलांसाठी चिठ्ठ्या टाकून प्रभाग आरक्षित करण्यात येतील, असेही कुमार यांनी सांगितले.