कोपर्डेहवेली – शिरवडे-पिंपरी रस्त्यावरील रेल्वे फाटकातील दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे बुधवारअखेर फाटक बंद राहणार आहे. परिणामी वाहनधारकांची तारेवरची कसरत सुरू असून पर्यायी मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीस सामोरे जावे लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
रेल्वे फाटक क्रमांक 94 च्या आतील रुळाची दुरुस्ती, खडीकरण, भरावा यासह इतर कारणांसाठी मंगळवारी सकाळी 10 वाजता गेट बंद करण्यात आले. ते दुसऱ्या दिवशी बुधवारपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनाने नजिकच्या ग्रामपंचायत, पोलीस स्टेशन, कारखाने, प्रसारमाध्यमे यांना कळवले होते.
परंतु अनेक वाहनधारकांना याची माहिती नसल्याने त्यांची फसगत झाली.पर्यायी व्यवस्था म्हणून काही वाहन धारकांनी मसूर ते शिरवडे असा प्रवास करण्यासाठी नडशी कॉलनी -शिरवडे रेल्वे स्टेशन ते शिरवडे या मार्गाचा वापर केला. परंतु या रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य असल्याने नवीन वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने किरकोळ अपघातांना समोरे जावे लागले. रात्री उशिरापर्यंत रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचे काम सुरु होते.