ढेबेवाडी – राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे शेतकरी, कामगारांच्या विरोधातील सरकार आहे. महागाई, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात असून भ्रष्टाचाराने तर सीमा पार केली आहे. हे आपल्यावरती अस्मानी सुलतानी संकट आहे. म्हणूनच येणार्याआ निवडणुकीत आपण त्यांच्या विरोधात महाआघाडीने सामोरे जात आहोत. आपण जो उमेदवार देवू त्याचे कार्यकर्त्यांनी इमानेइतबारे काम करावे. आपल्यातच आडवाआडवी, पाडापाडी, जिरवाजिरवी करीत बसू नका, हे अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असे प्रतिपादन विधानसभेचे विरोधी पक्षनेते आ. अजितदादा पवार यांनी केले.
गुढे, ता. पाटण येथे ढेबेवाडी-तळमावले विभागाच्यावतीने आयोजित राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर होते. या मेळाव्यास खा. श्रीनिवास पाटील, माजी पालकमंत्री आ. बाळासाहेब पाटील, युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर, राष्ट्रवादी आय.टी.सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील, बाळासाहेब सोळस्कर, राजेश पाटील वाठारकर, राजाभाऊ पाटील-उंडाळकर, सुभाषराव शिंदे, मानसिंगराव जगदाळे, राजेश पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
अजितदादा म्हणाले, मी व बाळासाहेब जिल्हाचे पालकमंत्री असताना विकासासाठी झुकते माप देण्याचे काम केले. आत्ताचे पालकमंत्री काय करताहेत! पाटण-चिपळूण रस्त्याची काय अवस्था आहे? याकडे कोण लक्ष देणार? कुठल्याच कामात क्वालिटी राहिली नाही. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. सत्तेची एवढी नशा, मस्ती, धुंदी चांगली नाही. सत्यजित पाटणकरांनी पायाला भिंगरी लावून खंबीरपणे काम करावे, आपण कुठे कमी पडत आहोत, याचा विचार करून नव्या दमाच्या कार्यकर्त्यांची फळी निर्माण करा.
सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, विक्रमसिंह पाटणकर दादांनी सुसंस्कृत राजकारण केले. विरोधक पाटणकरांच्या वाड्याबाहेर विजयी मिरवणुकीत शड्डू ठोकून द्वेषाचे निर्लज्ज राजकारण करीत आहेत. आमच राजकारण संघर्षातून पुढे आले आहे. काळ-वेळ बदलत असते. जनतेने जिल्हा परिषदेला एक आणि विधानसभेला एक, असा विचार करु नये. आपल्यातील मतभेद बाजूला ठेवून वेळेनुसार दोन पावले पुढे-मागे येवून सर्वांनी मिळून पक्ष मजबूत करूया.
माजी सभापती राजाभाऊ शेलार, राजे संघर्ष प्रतिष्ठानचे योगेश पाटणकर यांनी मनोगत व्यक्त केले. माजी उपसभापती रमेश मोरे यांनी प्रास्ताविक करून आभार मानेल. दरम्यान, अजितदादाच्या हस्ते राजे संघर्ष प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी योगेश पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला.