पिंपरी (प्रतिनिधी) – निगडी येथील भक्ती-शक्ती उद्यान चौकात महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे डांबरीकरण अर्धवट आहे.
पुलासाठी दिलेल्या कामाची मुदत संपून जवळपास नऊ महिन्यांचा कालावधी उलटला आहे. तरीही ठेकेदार काम पूर्ण करत नसल्याने उड्डाणपुलाचे काम अपूर्णच आहे. त्यामुळे येथे सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे. 15 ऑगस्टच्या मुहूर्तावर हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन होते. मात्र, काम पूर्ण न झाल्याने पूल वाहतुकीसाठी खुला केलेला नाही.
निगडी येथे उड्डाण पूल उभारण्याचे काम 27 जून 2017 मध्ये हाती घेण्यात आले. उड्डाण पूल, प्राधिकरण-रुपीनगर भागाला जोडणारा ग्रेडसेपरेटर आणि वर्तुळाकार रस्ता असे काम केले जात आहे. काम पूर्ण करण्यासाठी अडीच वर्षांची मुदत होती. मात्र, मुदतीत उड्डाणपुलाचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे पुलाच्या कामासाठी मुदतवाढ देण्यात आली. मुदतवाढ देऊन नऊ महिन्यांचा कालावधी होत आला. तरीही अद्याप उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला
केलेला नाही.
निगडी येथील उड्डाण पूल उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. डांबरीकरणाचे काम अर्धवट झाहे. ते काम लवकरच पूर्ण केले जाईल. ग्रेडसेपरेटर व रॅम्पचे काम पुढील दोन महिन्यांत पूर्ण होईल. पुलाच्या कामासाठी दिल्या जाणाऱ्या भाववाढ फरकाच्या रकमेसाठी वेगळी तरतूद केलेली नसते. भाववाढ फरकाची रक्कम कंत्राटदाराला द्यावीच लागते.
– विजय भोजने, प्रवक्ते, बीआरटीएस, महापालिका