करण जोहरचा ड्रीम प्रोजेक्ट “तख्त’ पुन्हा सुरू होणार आहे. या सिनेमाचे प्री प्रॉडक्शन आता सुरू झालेले आहे. स्टार इंडियाकडे या सिनेमाची भागीदारी होती. मात्र 150 कोटींचे बजेट या कंपनीला खूपच जड गेले होते.
म्हणून या कंपनीने या प्रोजेक्टमधून अंग काढून घेतले होते. आता स्टार इंडियाच्या जागेवर लायकाने या सिनेमासाठीची भागीदारी स्वीकारली आहे, असे समजते आहे. मात्र याची अजून अधिकृतपणे पुष्टी झालेली नाही.
आता या सिनेमाच्या कथेमध्ये थोडेफार फेरबदल केले जाणार आहेत. दारा शिकोह आणि औरंगजेब यांच्यातील लढाया आणि त्यांच्या वैयक्तिक प्रेमसंबंधांचेही चित्रण या सिनेमात बघायला मिळणार आहे.
या दोघांच्या हिंदू राजांबरोबरच्या लढायांचा भाग वगळण्याचा विचार सुरू आहे. या सिनेमाचे शूटिंग कधी सुरू करायचे यावर कलाकारांच्या तारखा कधीपासून मिळवायच्या हे निश्चित केले जाणार आहे.
यामध्ये रणवीर सिंह आणि आलिया भट असणार हे जवळपास निश्चित आहे. पण सध्या हे दोघेही वेगवेगळ्या सिनेमांमध्ये व्यस्त आहेत. या दोघांव्यतिरिक्त विकी कौशलदेखील लीड रोलमध्ये दिसणार आहे.