अष्टविनायक मार्गाचे काम बंद पाडले

केसनंदमध्ये संतप्त ग्रामस्थ आक्रमक : सांडपाण्याचा प्रश्‍नामुळे काम रोखले

वाघोली- केसनंद (ता. हवेली) येथील अष्टविनायक राज्य मार्गाचे सुरू असलेल्या कामाबाबत वारंवार तक्रार करून देखील हे काम नियमानुसार होत नसल्याने केसनंद ग्रामपंचायतीचे ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्यांनी हे काम बंद पाडले.
गावातील अंतर्गत सांडपाण्याचा प्रश्‍न सध्या गंभीर आहे. नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी हा प्रश्‍न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केला असल्याचे दिसून येत असतानाच अष्टविनायक राज्य महामार्गाला शासनाच्या नियमानुसार कोणत्याही ठिकाणी गावातील सांडपाण्याचा विसर्ग करण्याची सुविधा अथवा उपाययोजना संबंधित ठेकेदाराने केली नसल्याने ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात नाराज झाले होते. याबाबत ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य केसनंद थेऊर रोड चौकात सुरू असलेले सिमेंट कॉंक्रिटीकरणाचे काम बंद पाडून ठेकेदाराला शासनाच्या नियमानुसार केसनंद गावाच्या सांडपाण्याच्या विसर्गाची व्यवस्था केल्यानंतर काम सुरू करण्याचा इशारा देण्यात आला. यानंतर हे काम बंद पाडले.

 

ग्रामपंचायत सदस्य प्रमोद हरगुडे यांनी सांगितले की, अतिवृष्टी अथवा पावसाच्या पाण्याने केसनंद गावामध्ये रस्त्यावर पावसाचे पाणी साचण्याचे प्रमाण डोंगररांगामुळे जास्त आहे. डोंगररांगांमुळे पावसाच्या पाण्याचा विसर्ग करण्याची एकमेव जागा ही रस्त्यालगत असणारे ओढे, नाले होते. सांडपाण्याची लाईन बऱ्याच ठिकाणी संबंधित ठेकेदार आणि तोडून टाकली आहे. हे पावसाचे पाणी रस्त्यावर येण्याची किंवा नागरिकांच्या घरात शिरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ठेकेदारांनी शासनाच्या नियमानुसार काम न केल्याने अनेक ठिकाणी पावसाचे पाणी शिरून पूरस्थितीचा सामना नागरिकांना करावा लागू शकतो याची कल्पना संबंधित ठेकेदार व प्रशासनाला लेखी पत्राद्वारे दिली होती. पण त्याची कोणतीच दखल घेतली जात नसल्याने काम बंद पाडून प्रशासनाला जागे करण्यात आले आहे.

 

ठेकेदारांचे प्रतिनिधी संजय साठे यांनी तात्काळ या ठिकाणी भेट देऊन हे काम ग्रामस्थ, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि प्रशासनाच्या नियमानुसार करून देण्याचे आश्‍वासन संबंधित ग्रामपंचायत सदस्यांना दिले आहे. यावेळी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सचिन जाधव, ग्रामपंचायत सदस्य सचिन हरगुडे, विशाल हरगुडे, दत्ता आबा हरगुडे, शिवाजी हरगुडे, दिनेश झांबरे, अनिल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.