पंपिंग स्टेशनचे काम कासवगतीने

कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पाणी साठले; सुरक्षेच्यादृष्टीने कोणतीही उपाययोजना नाही

कात्रज – शहराला चोवीस तास पाणीपुरवठा करणाऱ्या प्रकल्पअंतर्गत पुण्यात जे काही सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये कात्रज येथील वंडर सिटी शेजारील महानगरपालिकेच्या आरक्षित जागेमध्ये पपिंग स्टेशन उभारले जात आहे. पण पंपिंग स्टेशनचे काम संथ गतीने सुरू असून या कामासाठी खोदलेल्या खड्डयात पावसाचे पाणी साठले आहे. सुरक्षेच्यादृष्टीने याठिकाणी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.

गेल्या दोन महिन्यांपासून काम सुरू आहे. येथील पंपिंग स्टेशनचे काम हे एल अँड टी कंपनीला देण्यात आले आहे; परंतु काम अजूनही संथ गतीने आहे. त्यामुळे शेवाळयुक्त पाण्याचा दुर्गंधी पसरल्याने परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे. पंपिंग स्टेशनच्या कामासाठी घेतलेल्या खड्ड्यामध्ये जवळजवळ सहा फूट इतके पाणी साठलेले आहे आणि याठिकाणी कोणतीही सुरक्षेची उपाययोजना केलेली नाही. सुरक्षेच्या दृष्टीने कंत्राट मिळालेल्या कंपनीने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. एखादी दुर्घटना घडल्यास कंत्राटी कंपनी व मनपा प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल नागरिक करीत आहेत.

वंडर सिटी शेजारील पंपिंग स्टेशनसाठी घेण्यात आलेल्या खड्ड्याची पाहणी केली आहे. तर पत्रव्यवहारद्वारे काम सुरू आहे. यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्या ठिकाणचा सिव्हिल ड्रॉईंग अजून मंजूर झालेला नाही. तो मंजूर झाल्यावर काम ताकाळ सुरू होईल. तर तेथील सुरक्षेविषयी कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारणा करणार आहे.
– सीमा साळुंखे, कनिष्ठ अभियंता, बांधकाम विभाग, मनपा


पंपिंग स्टेशनचे काम लवकरात लवकर झाले नाही. तर आयुक्तांकडे तक्रार करणार आहे. त्यानंतर आंदोलन करण्यात येईल. तसेच पंपिंग स्टेशनच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साठले आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढली असून डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजारांचा फैलाव होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात येऊ शकते.
– युवराज बेलदर, स्थानिक नगरसेवक

Leave A Reply

Your email address will not be published.