पुणे,{प्रभात वृत्तसेवा} – मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणे हा भाषेचा गौरव आहे. आता भाषा विकास आणि प्रचार यादृष्टीने काम करावे लागेल.
मराठी शाळेत दर्जा सुधारणे, पटसंख्या वाढवणे याबाबत काम करावे लागेल. आपली पुढील काळात खरी परीक्षा आहे. पुढील अर्थसंकल्पात भाषेसाठी निधी तरतूद करण्यात येईल, अशी अपेक्षा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी व्यक्त केली.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याच्या निमित्त पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर पुणे पुस्तक महोत्सव आणि संवाद पुणे यांच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख, रामदास फुटाणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी,
माजी खासदार प्रदीप रावत, राजीव तांबे, राहुल सोलापूरकर, आनंद माडगूळकर, धीरज घाटे, दीपक मानकर, किरण साळी, राजीव बर्वे, सुनील महाजन, राजेश पांडे उपस्थित होते. यावेळी अभिनेते प्रवीण तरडे यांनी केंद्र शासनाचा अभिनंदन ठराव केला.
प्रत्येक भाषेचे सेंटर ऑफ एक्सेलंस तयार करून त्यात मनुष्यबळ उपलब्ध करावे. देशात ५० पेक्षा अधिक केंद्रीय विद्यापीठ आहे त्याठिकाणी आपल्या भाषेचे अध्यासन केंद्र सुरू करण्यात यावे. अभिजात भाषा यांना कोणताही मतभेद न करता सम प्रमाणात निधी देण्यात यावा.
तसेच त्यासाठी वेगळी तरतूद असावी. अभिजात भाषा दर्जा दिल्याने मराठी ही प्राचीन आणि कोणत्या दुसऱ्या भाषेतून आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मराठी भाषा ज्ञानभाषा झाली पाहिजे.
मराठी नाटक, सिनेमा आपण पहिले पाहिजे, मराठी पुस्तके विकत घेऊन वाचावीत. भाषेबाबत आपली अस्मिता टोकदार होणार नाही, तोपर्यंत ती जिवंत राहून टिकणार नाही, असे देशमुख यांनी नमूद केले. फुटाणे, डॉ. गोसावी, माडगूळकर यांनी मनोगत व्यक्त केले. पांडे यांनी प्रास्ताविक केले. महाजन यांनी आभार मानले.