कामांच्या ओझ्याखाली भाऊसाहेब गुदमरले

हवेलीतील तलाठी, मंडलाधिकाऱ्यांवर सात महिन्यांपासून अतिरिक्‍त ताण

थेऊर – हवेली तालुक्‍यातील तलाठी व मंडलाधिकारी यांच्यावरील प्रशासनातील अतिरिक्‍त कामाचा ताण वाढला आहे. शासकीय सुट्टीच्या दिवशीही वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यांना कामाचा निपटारा करावा लागत आहे. दोन महिन्यांपासून तलाठी भाऊसाहेब मेटाकुटीला आले आहेत. काही गावकामगार तलाठ्यांचे अतिरिक्‍त कामामुळे कौटुंबिक स्वास्थ्य बिघडले आहे.

पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. त्यांच्या दैनंदिन कामकाजात अडथळा निर्माण झाला आहे. याकामी तलाठ्यांना दिवसभर व रात्री उशिरापर्यंत पुण्यातील एका कॉलेजमध्ये या कामाचा आढावा घेत मतदारांच्या डाटा एंट्रीचे काम करावे लागत आहे. याप्रसंगी त्यांच्यासमवेत नायब तहसीलदार, तहसीलदार व उपविभागीय अधिकारी हजर राहून सूचना करीत आहेत.

त्यातच जिल्हाधिकारी कार्यालयातून हवेलीतील तलाठी व मंडलाधिकारी यांचे दफ्तर तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आणखी भाऊसाहेब मानसिकदृष्ट्‌या कोलमडले आहेत. मात्र, यावर तलाठी व मंडलाधिकारी संघटना मूग गिळून गप्प बसल्याने त्यांच्यावर तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार सहन करण्याची वेळ आली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या कार्यकाळात अचानक अतिवृष्टीने जोरदार तडाखा दिल्यामुळे निवडणुकीचे काम संपताच कोतवाल, तलाठी व मंडलाधिकारी पूरस्थितीची पाहणी करीत आहेत. वादळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनाम्याचे काम करीत आहेत. हवेलीतील सुमारे 50 तलाठी व 10 मंडलाधिकाऱ्यांनी पुणे डिव्हिजनमधील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यातील पदवीधर मतदारांचे डाटा एंट्रीचे काम केले आहे. लवकरच तलाठी सजामधील प्रलंबित कामांचा निपटारा करणार असल्याची माहिती हडपसरचे मंडलाधिकारी व्यंकटेश चिरूमुल्ला यांनी दिली.

जानेवारीपासून वाढता वाढे ताण

या कामांचा निपटारा होत असताना त्यातच पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील मतदार याद्यांचे काम व दैनंदिन संगणकीय 7/12 व फेरफार, दाखले, स्थळपाहणी, वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येणारे अहवाल, गौणखनिज चोरीचे पंचनामे, फेरफार नोंदीच्या तक्रारी, त्यासंबंधीत नोटीसा बजावणे, मंडलाधिकारी यांच्याकडील तक्रार केसेसच्या सुनावणी आदी कामे काहीअंशी प्रलंबित राहिले आहेत. त्यामुळे महसूल पथकाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

हवेलीतील मंडलाधिकारी व तलाठी यांची संयुक्‍तपणे आढावा बैठक घेतली आहे. यामध्ये प्राधान्याने संगणकीय 7/12, फेरफार व महसूली सजांमधील प्रलंबित कामे तातडीने पुर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. याकामी कोणत्याही तलाठ्यांने व मंडलाधिकारी यांच्याकडून कामचुकारपणा झाल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.
– सचिन बारवकर, उपविभागीय अधिकारी, हवेली, उपविभाग पुणे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here