हवेलीच्या विभाजनाचा मुद्दा ऐरणीवर

४६ तलाठ्यांवर १३० गावांचा भार : अतिरिक्‍त कामांमुळेच अधिकारी हतबल

थेऊर – हवेली तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात 130 महसुली गावे आहेत. त्याकामी कार्यालयात फक्‍त 7 अव्वल कारकून, 12 कारकून, तीन नायब तहसीलदार असून एकूणच तालुक्‍याची महसूलची जबाबदारी त्यांच्यावर आहे. तुटपुंज्या कर्मचाऱ्यांकडे कार्यविवरणाची आवक जावक पाहता याठिकाणी आणखी कर्मचारी भरती करण्याची मागणी होत आहे.

130 गावांचा भार 46 तलाठ्यांवर पडला आहे. अनेक वर्षांपासून हवेलीमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याबाबतची मागणी शासनस्तरावर प्रलंबित आहे. हवेली तहसीलचे आणखी विभाजन करण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

शिरूर- हवेलीचे तत्कालीन आमदार अशोक पवार यांच्या कार्यकाळात 30 गावे अप्पर तहसील पिंपरी चिंचवडला जोडली आहेत. अद्यापही 130 गावांचा महसुली कारभार हवेली तहसील कार्यालयातून चालवला जातो. 130 गावांसाठी तालुक्‍यामध्ये 46 तलाठी सजा आहेत. यावर 8 मंडलाधिकारी आहेत.

46 गावकामगार तलाठीमधील 5 तलाठी भाऊसाहेबांच्या हवेली प्रांत कार्यालय व तहसील कार्यालयात ड्राफ्टेड बदल्या झालेल्या आहेत. त्यामुळे काही तलाठ्यांकडे अतिरिक्‍त कार्यभाराचा बोजा कायम असल्याने दोन्ही सजांमधील कामकाज पाहताना त्यांची चांगलीच दमछाक होते. त्यामुळे हवेली तालुक्‍याच्या महसुली कार्यक्षेत्राचे अजून विभाजन करण्याची मागणी नागरिकांकडून पुढे येऊ लागली आहे.

हवेली तहसील कार्यालयात वतन संकलन, जमीन संकलन, फौजदारी संकलन, ग्रामपंचायत संकलन, आस्थापना, जमाबंदी संकलन, कुळकायदा संकलन, पुनर्वसन संकलन, आरटीएस संकलन, अभिलेख संकलन, पुरवठा विभाग, आवक जावक संकलन, रोहयो संकलन, नागरी सुविधा, गौणखनिज संकलन आदी संकलनाचा कार्यभार चालला जातो. मात्र, अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे येथील अनेक प्रकरणे प्रलंबित राहिल्याने कर्मचारीही हतबल झाले आहेत.

एकूणच हवेलीतील कार्यभार 7 अव्वल कारकून व 12 कारकूनांवर अवलंबल्यामुळे अनेक कार्यभारात विलंब होऊ लागल्याने खातेदार शेतकऱ्यांच्या मोठ्या रोषास अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागण्याची वेळ हवेलीवर ओढवली आहे. अनेकदा तहसील कर्मचारी व नागरिकांमध्ये खटके उडत आहेत.

हवेलीमध्ये मंडलाधिकारी कार्यालयातील थेऊर मंडल अधिकारी कार्यालयात 5 महसुली गावे, वाघोली मंडल अधिकारी कार्यालयात 6 महसुली गावे, हडपसर मंडल अधिकारी कार्यालयात 5 महसुली गावे व वाड्या वस्त्या, उरूळी कांचन मंडल अधिकारी कार्यालयात 6 महसुली गावे, कळस धानोरी मंडल अधिकारी कार्यालयात 6 महसुली गावे, कोथरूड मंडल अधिकारी कार्यालयात 6 महसुली गावे, खेड शिवापूर मंडल अधिकारी कार्यालयात 6 महसुली गावे, खडकवासला मंडल अधिकारी कार्यालयात 7 महसूली गावांचा समावेश आहे.

यामध्ये खडकवासला, हडपसर, कोथरूड, खेड शिवापूर सर्कलमध्ये सर्वांत जास्त महसुली कामे आहेत. तलाठ्यांची संख्या कमी असल्यामुळे प्रत्येक तलाठ्यांवर कामांचा बोझा पडत आहे. त्यामुळे भाऊसाहेब मेटाकुटीला आले आहेत.

अकरा महिन्यांपासून “भाऊसाहेब’ व्यस्त
लोकसभा निवडणुकीपूर्वी जानेवारीपासून महसूल खात्यावर कामांचा ताण वाढला आहे. जानेवारीपासून लोकसभेची कामे सुरू झाली. त्यात आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर पुन्हा भाऊसाहेबांचे डोके वर निघाले नाही. लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर थोडी उसंत मिळत होती. त्यातच महापूर आणि इतर कामांचा ताण पडला.

त्यानंतर विधानसभेचे पडघम वाजायला सुरू झाले. त्यात भाऊसाहेब कामांच्या ओझ्याखाली गुरफटून गेले आहेत. विधानसभेचे काम पूर्ण होते तोपर्यंत पुन्हा परतीच्या आणि वादळी पावसाचा तडाखा जिल्ह्याला बसला. त्यामुळे पुन्हा नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यासाठी व्यस्त झाले होते. या सर्वांचा परिणाम त्यांच्या राहणीमानावर झाला आहे. त्यामुळे तलाठी आणि मंडलधिकाऱ्यांची अवस्था ओझे वाहण्यापुरतीच झाली आहे काय, असा संतप्त सवाल उमटत आहे.

महाराष्ट्र राज्यात तलाठी संवर्गातील वीस टक्‍के पदे रिक्‍त असून तलाठी यांच्यावर अतिरिक्‍त कार्यभाराचा बोजा कायम आहे. पाच टक्‍के तलाठी रजेवर असल्याने 75 टक्‍के तलाठी संपूर्ण राज्यात शंभर टक्‍के महसुली कार्यभार करत असतात. महाराष्ट्रातील 358 तालुक्‍यात हीच परिस्थिती आहे. राज्यात 1 लाख 2 हजार 637 तलाठी कार्यरत आहेत. 2 हजार 106 मंडलाधिकारी पदे आहेत.

आणखी 3 हजार 165 तलाठी पदे शासनाने मंजूर केली असली तरी त्यांची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. हवेलीत शहरीकरण झपाट्याने विकसित होत आहेत. महसुली कामे जास्त आहेत तरीही तलाठी व मंडलाधिकारी यांच्याकडून मोठ्या सजामध्येही विहित वेळेत कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे. संगणकीय सातबारासोबत इतरही अतिरिक्‍त कामे असल्याने तलाठी संवर्गातील इतर रिक्‍त पदे राज्य शासनाने तातडीने भरावीत.
ज्ञानदेव डुबल, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य तलाठी संघटना

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here