मोलकरणींचा गावाकडे जाण्यावर भर: काही सोसायट्या नाकारताहेतं प्रवेश
पिंपरी – शहरात “करोना’चे रुग्ण आढळत असल्याने भीतीसोबत खूप जास्त खबरदारी घेतली जात आहे. बहुतेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना “वर्क फ्रॉम होम’ची मुभा दिली आहे. यामुळे वर्किंग वुमन सध्या घरुनच काम करत आहेत. परंतु “वर्क फ्रॉम होम’ करत असताना त्यांना आता सोबत घरकामही करावे लागत आहे. घरकाम करणाऱ्या अनेक महिलांनी देखील पुन्हा आपल्या गावाकडची वाट धरली आहे. तर काही ठिकाणी सोसायट्या आणि नागरिकांनीच घरकाम करणाऱ्या महिलांना काही दिवस सुट्टी घेण्यास सांगितले आहे.
एरवी नोकरदार महिलांचे कामवाली बाईशिवाय पान हलत नाही. मात्र मागील तीन चार दिवसांपासून याउलट परीस्थिती निर्माण झाली आहे. आता चिंचवड, पिंपळे सौदागर तसेच शहरातील काही भागातील सोसायटयांमध्येच घरकामगारांना प्रवेश नाकारण्यात येत आहे. त्यांना एक महिन्याचा पगार देऊन उद्यापासून आम्ही बोलवत नाही तोपर्यत कामावर येउ नका, असे स्पष्ट शब्दात सांगण्यात येत आहे. एकच कामवाली अनेक घरात काम करते. त्यामुळे आपल्यालाही करोनाचा त्रास होऊ शकतो. जोपर्यंत करोनाचे प्रमाण कमी होत नाही. तोपर्यंत सोसायटीमध्ये कामवालीबाईना प्रवेश नाकारण्यात आला असल्याची माहिती घरकाम करणाऱ्या महिलांनी दिली आहे.
कोणत्याही प्रकारे संभाव्य संसर्ग टाळण्यासाठी भरलेल्या दिवसांचा पगार देत सोसायटीत प्रवेश नाकारला आहे. यामुळे घरकाम कामगारांनी नाराजी व चिंता अशा संमिश्र भावना व्यक्त केल्या. गावाकडील वारंवार पडणाऱ्या दुष्काळाला वैतागून पोट भरण्यासाठी आम्ही शहरात आलो, परंतु आता इथेही उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे आता गावाकडे जाण्याशिवाय पर्याय नाही, अशा भावना या कामवाल्यांनी व्यक्त केल्या.
महिलांसाठी आवश्यक उपाययोजना
काही सोसायटींमधील महिलांनी घरकाम करणाऱ्या महिलांना प्रवेश नाकारण्यास ठाम विरोध केला आहे. सुरक्षिततेचे उपाय वापरुन घरकाम करणाऱ्या महिलांना प्रवेश देण्यास भाग पाडले. घरकाम करणाऱ्या महिला आल्या नाहीत तर काम कसे होणार असा प्रश्न उपस्थित करत घरकाम करणाऱ्या महिलांसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या.