वॉशिंग्टन – फेसबुकने आपल्या 48 हजार कर्मचाऱ्यांना जुलै 2021 पर्यंत घरूनच काम करण्यास सांगितले आहे. घरूनच काम करण्यासाठीची सुविधा उभारण्यासाठी कर्मचाऱ्यांना 1 हजार डॉलरचा अतिरिक्त भत्ताही देण्यात आला आहे. फेसबुकने आपल्या कर्मचाऱ्यांना या वर्षाच्या अखेरीपर्यंत घरूनच काम करण्याची सूचना यापूर्वीच दिली होती.
सरकार आणि आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार फेसबुकच्या अंतर्गत व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांसाठीची “वर्क फ्रॉम होम’च्या सुविधेची मुदत आणखी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, असे फेसबुकच्या प्रवक्त्याने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
अमेरिकेमध्ये कोविड-19 ची साथ आटोक्यात येण्याची कोणतीही लक्षणे अद्याप दिसत नाही आहेत. गुगलनेही आपल्या तब्बल 2 लाख कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्याची सुविधा पुढील वर्षाच्या मध्यपर्यंत तरी सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
कर्मचाऱ्यांची क्षमता आणि कार्यशक्ती अबाधित राखण्यासाठी ज्या कर्मचाऱ्यांची कार्यालयामध्ये थांबण्याची आवश्यकता नाही, त्यांना पुढील वर्षी जुलैपर्यंत घरूनच काम करण्याची सुविधा कायम असेल असे गुगलचे मुख्य कार्यकारी सुंदर पिचई यांनी कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या ई मेलमध्ये म्हटले आहे. “वर्क फ्रॉम होम’ची सुविधा पुढील वर्षी जानेवरीपर्यंत सुरू ठेवण्याचे गुगलने यापूर्वी तात्पुरते ठरवले होते. ट्विटरनेही आपल्या कर्मचाऱ्यांना जर आवश्यक वाटत असेल, तर घरून काम करण्याची परवानगी दिलेली आहे.
मे महिन्यात फेसबुकचे मुख्य कार्यकारी मार्क झुकेरबर्ग यांनी निम्म्या कर्मचाऱ्यांना 2030 पर्यंत घरूनच काम करण्याच्या एका योजनेचा आराखडाही तयार केला आहे. त्यांच्या या आराखड्यानुसार फेसबुकचे निम्मे कर्मचारी पुढील 5 ते 10 वर्षे घरूनच काम करू शकतील.