पिंपरी – ‘करोना’चा संसर्ग टाळण्यासाठी शहरातील बहुतेक कार्पोरेट आणि आयटी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना लॅपटॉप देऊन “वर्क फ्रॉम होम’ करण्यास सांगितले आहे. परंतु “निसर्ग’ चक्रीवादळामुळे “वर्क फ्रॉम होम’ही थांबले. सकाळपासूनच वादळी वाऱ्याने शहराची अवस्था बिकट केली होती. विजेचे खांब, डीपी कोसळले होते. यामुळे सकाळपासूनच शहरातील अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. पर्यायाने लॅपटॉपची बॅटरी चालेपर्यंतच “वर्क फ्रॉम होम’ चालले आणि दुपारनंतर हळूहळू शटडाऊन होऊ लागले.
“करोना’मुळे आधीच आर्थिक संकटांशी झुंजत असलेल्या कंपन्यांचे काम थांबल्याने त्यांना अजूनच मोठा फटका बसला. विशेषत आयटी क्षेत्रातील केपीओ, बीपीओ आणि प्रोग्रामिंग कंपन्यांना अचानक काम थांबल्याने आर्थिक झळ सोसावी लागली. रात्री उशिरापर्यंत बऱ्याच भागात वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता, त्यामुळे दुसऱ्या शिफ्टचेही काम खोळंबले होते.