कुटुंबाच्या मोहातून मुक्त होऊन काम करा; काँग्रेसमध्ये आणखी एक लेटर’बॉम्ब’

नवी दिल्ली – कॉंग्रेसच्या 23 ज्येष्ठ नेत्यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र पाठवले. त्यातून त्यांनी पक्षात संघटनात्मक पातळीवर तातडीने सुधारणा करतानाच पूर्णवेळ अध्यक्ष निवडण्याची मागणी केली होती. आता पुन्हा एकदा उत्तरप्रदेशमधील काही नेत्यांनी लेटर बॉम्ब टाकला आहे. यामुळे पुन्हा एकदा पत्रावरून पक्षासह राजकारण चांगलेच ढवळून निघण्याची शक्यता आहे.

उत्तरप्रदेशमधील माजी खासदार, संतोष सिंह, माजी मंत्री सत्यदेव त्रिपाठी, माजी आमदार विनोद चौधरी, भूधर नारायण मिश्रा, नेकचंद पांडे, स्वयं प्रकाश गोस्वामी आणि संजीव सिंह या नेत्यांच्या पत्रावर स्वाक्षरी आहेत. कॉंग्रेसच्या सरचिटणीस आणि उत्तरप्रदेशच्या प्रभारी प्रियांका गांधी-वढेरा यांना अपत्यक्षपणे लक्ष्य करत  सोनिया गांधींना कुटुंबाच्या मोहातून मुक्त होऊन पक्षाच्या लोकशाही परंपरा पुन्हा प्रस्थापित करण्याचे आवाहन पत्रातून केले आहे. 

काय आहे पत्र?

उत्तरप्रदेशमध्ये काँग्रेस पक्ष सर्वात वाईट काळातून जात आहे. राज्य प्रभारी तुम्हाला सद्यस्थितीबद्दल माहिती देत ​​नसल्याची भीती आहे. आम्ही जवळपास एका वर्षांपासून तुम्हाला भेटण्यासाठी अपॉइंटमेंट मागत आहोत. पण, अपॉइंटमेंट नाकारली जात आहे. आम्ही आमच्या हद्दपारीविरोधात अपील केले होते. जे अवैध होते. परंतु, समितीलासुद्धा आमच्या आवाहनावर विचार करण्यासाठी वेळ मिळाला नाही. खरं तर, आम्हाला माध्यमांमधून आमच्या हद्दपारीविषयी माहिती मिळाली होती.

जे लोक पगाराच्या आधारावर काम करतात आणि पक्षाचे प्राथमिक सदस्यही नाही. त्यांच्याकडे पक्षाची पदे आहेत. हे नेते पक्षाच्या विचारधारेशी परिचित नाहीत, परंतु त्यांना उत्तरप्रदेशमध्ये पक्षाला दिशा देण्याचे काम देण्यात आलेले आहे.

हे लोक 1977-80 च्या संकटकाळात कॉंग्रेसबरोबर उभे राहिलेल्या नेत्यांच्या कामगिरीचे आकलन करत आहेत. लोकशाही निकष मोडकळीस आणले जात  आहेत. तसेच ज्येष्ठ नेत्यांना लक्ष्य केले जात असून त्यांचा अपमान केला जात आहे आणि काढून टाकले जात आहे.

तसेच, नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये संवादाचा अभाव असल्याचा आरोपही पत्रातून करण्यात आला आहे. उत्तरप्रदेशमधील एनएसयूआय आणि युवा कॉंग्रेस निष्क्रिय झाले आहेत. वरिष्ठ नेत्यांशी संवाद वाढविण्यासाठी कॉंग्रेस हाय कमांडला नेत्यांनी मागणी केली आहे.

सध्याच्या घडामोडींकडे डोळेझाक केली गेली तर एकेकाळी पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या उत्तरप्रदेशमध्ये कॉंग्रेसचे मोठे नुकसान होईल, असेही पत्रातून सांगण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.