पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने रस्ते साफसफाईच्या कामांसाठी ड व फ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी ड क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणारे काम देण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या ठेकेदारावर बोगस कागदपत्रे सादर केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांची सध्या चौकशी सुरू आहे, असे असतानाही त्याच ठेकेदारास रस्ते सफाईचे तब्बल 20 कोटींचे काम देण्यात आले आहे.
महापालिकेच्या रुग्णालयांना मेडिकल, पॅरामेडिकल कर्मचारी पुरविण्यासाठी झालेल्या निविदा प्रक्रियेमध्ये श्रीकृपा सर्व्हिसेस या ठेकेदाराने महापालिकेला खोटी कागदपत्रे सादर केल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक व माजी महापौर योगेश बहल यांनी केला होता.
त्यानंतर कागदपत्रांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. ही कार्यवाही अद्याप सुरू असताना मेसर्स श्री कृपा सर्व्हिसेस यांना आरोग्य विभागातील रस्ते साफसफाईचे काम देण्यात आले आहे. ड क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणारे रस्ते, गटर्स यांची दैनंदिन सफाई करण्यासाठी तीन वर्षांच्या कालावधीसाठी तब्बल 20 कोटी 72 लाख 73 हजार रुपये खर्च येणार आहे.
अधिकाऱ्यांना याबाबत स्थायी समितीच्या बैठकीमध्ये विचारले होते. त्यावर अधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाच्या निविदा प्रक्रियेसाठी संबंधित ठेकेदारांनी सादर केलेले कागदपत्रे योग्य असल्याचे सांगितले. त्यामुळे या विषयाला मान्यता दिली.
– ऍड. नितीन लांडगे, अध्यक्ष स्थायी समिती.