#प्रभात_दीपोत्सव_२०२० : शब्द

– विश्वास मेहेंदळे


आज या घटनेला किमान 40 वर्षे तरी झाली. त्या काळात मी मुंबईच्या दूरदर्शन केंद्रात नोकरी करीत होतो. डोंबिवलीला राहत असे. डोंबिवलीहून सकाळी 9 वाजताची गाडी पकडून दादरला उतरून मी दादरमधल्या सिद्धीविनायक मंदिराजवळच्या स्टॉपवर बस पकडून पुढे वरळीला जायचो. हा रोजचा परिपाठ होता. 

एके दिवशी मी असाच बसस्टॉपवर उभा असताना माझ्या कानावर एक हाक आली… ‘अहो! विश्‍वासराव!’ मी मागं वळून बघितलं. साधारण 80-82 वर्षांचे वृद्ध, शिडशिडीत बांध्याचे, धोतर, अंगात शर्ट घातलेले, एक आंगठ्याची चप्पल आणि डोक्‍यावर बेलबुट्टीची टोपी अशा वेशातले एक गृहस्थ मला हाक मारीत होते. 

त्या काळात मी दूरदर्शनच्या पडद्यावर येऊन ‘सप्रेम नमस्कार’ या नावाचा पत्रोत्तरांचा एक लोकप्रिय कार्यक’म दर आठवड्याला सादर करायचो. त्यामुळे आणि त्याकाळात दूरदर्शन ही एकच वाहिनी असल्याकारणाने लोक मला नावानिशी ओळखायचे.

ते गृहस्थ माझ्याजवळ आले. मला म्हणाले, ‘तुम्ही मला ओळखत नाही पण आम्ही तुम्हाला तुमच्या कार्यक्रमामुळे ओळखतो. तेव्हा अचानक हाक मारली म्हणून रागावू नका. माझं तुमच्याकडे एक काम आहे.’

मला वाटलं नेहमीप्रमाणे अनेक जण सांगतात त्याप्रमाणे या गृहस्थांनाही काही तरी कार्यक’म सुचवून दूरदर्शनच्या पडद्यावर चमकण्यासाठी आपल्याशी बोलायचे असेल.
मी त्यांना म्हटलं, ‘बोला काय काम!’
त्यावर तेच आपण होऊन म्हणाले, ‘काम म्हणजे दूरदर्शनवर कार्यक्रम वगैरे स्वरुपाचं नाही तर वेगळंच काम आहे.’

मी त्यांना म्हटलं, ‘सांगा हो, पटकन बोला. नाहीतर तेवढ्यात माझी बस येईल.’
ते म्हणाले, ‘तळेगाव-दाभाडे या पुणे-मुंबई रस्त्यावर आमचा एक सहा हजार चौरस फुटांचा कॉर्नरवर असणारा प्लॉट आहे. तो तुम्ही विकत घ्यावा.’
मी त्यांना म्हटलं, ‘तुम्ही म्हणता तर घेतला प्लॉट.’
त्यावर ते म्हणाले, ‘अहो, तुम्ही किंमत वगैरे काहीच विचारलं नाही आणि एकदम घेतो म्हणालेत, हे कसं काय?’

त्यावर मी म्हणालो, ‘अहो इतक्‍या प्रेमाने, आपुलकीने तुम्ही मला प्लॉट देताहात तर मी म्हटलं नाही कशाला म्हणा, घेऊन टाकू या.’
त्यावर ते गृहस्थ नुसतेच हसले आणि म्हणाले, ‘अहो तुम्ही माझं नाव वगैरे काहीच विचारलं नाही. मी कुठं राहतो, तुम्ही काय करता, वगैरे काहीच विचारल नाहीत’ असं ते गृहस्थ म्हणाले आणि त्यांनीच पुढे सांगायला सुरुवात केली.

‘माझ नावं चिथडे. गेली चाळीस वर्षे मी इथचं सिद्धीविनायक मंदिराजवळच्या चाळीत राहतो. इथले सारे लोक मला ‘काका चिथडे’ म्हणून ओळखतात. तर कधी जाऊ या प्लॉट बघायला! शनिवार- रविवार जाऊ या का!’ आणि पुढच्याच शनिवारी आम्ही तळेगावला जायला निघालो. मी, माझी पत्नी, माझा मेहुणा आम्ही पुण्याला पोहोचलो. चिथडेकाका स्वतंत्रपणे एकटेच पुण्याला पोहोचले.

पुणे स्टेशनवर आम्ही ठरल्याप्रमाणे एकत्र आलो. तिथून पायी पाच मिनिटांनंतरच पुणे जिल्हाधिकारी कचेरी तिथं जाऊन साठेखत करायचं असं आमचं ठरलं होतं. दरम्यान त्या प्लॉटसाठी चिथडेकाकांची अपेक्षा साधारण दहा हजार रुपये इतकी होती. ती मला मान्य होती. त्यातली काही रक्‍कम चिथडेकाकांना अदा करून आमच्या परिचयाच्या दंडवते नावाच्या जिल्हाधिकाऱ्याच्या कचेरीत काम करणाऱ्या एका बाईंच्या ओळखीने आम्ही आमचं साठेखतांच काम उरकून घेतलं.

ते झाल्यानंतर चिथडेकाका म्हणाले, ‘विश्‍वासराव तुम्ही अजून प्लॉट प्रत्यक्ष बघितलेला नाही. इथून तळेगावला बसेस सुटतात. अडीच रुपये इतके तिकीट आहे. आपण जाऊ या तळेगावला आणि एकदा प्लॉट प्रत्यक्ष बघू या.’ आम्हालाही तसा भरपूर वेळ होता. मी त्यांना लगेच होकार दिला. त्यांनी स्टेशनच्या जवळच असणाऱ्या बसस्टॉपवर आम्हाला नेलं. बस उभीच होती.

आम्ही चौघं त्या तळेगावकडे जाणाऱ्या बसमध्ये बसलो. तिकीट देणारा कंडक्‍टर त्याचा तो चिमटा वाजवित तिकीट-तिकीट अशी आरोळी देत चिथडेकाकांकडे प्रथम पोहोचला.
चिथड्यांनी माझ्याकडे बोट दाखवत त्या कंडक्‍टरला सांगितले, ‘ते बुशशर्ट घालून बसलेले गृहस्थ आहेत ना त्यांच्याकडून घ्या तिकिटाचे, आमच्या चौघांचे दहा रुपये.’ मला वाईट वाटले, राग आला.

मी मनात म्हटलं, ‘काय चिथडे गृहस्थ आहे हा! आपण याला त्याच्या प्लॉटची किंमत म्हणून दहा हजार रुपये देणार आहोत. पण तिकिटाचे दहा रुपये हे काही हा गृहस्थ स्वतः देत नाही. आपल्याला द्यायला सांगतोय.

पुण्यात आपण जेवायला थांबलो (म्हणजे त्यांच्याच आग्रहावरून) हा गृहस्थ सांगतो, मी माझ्या बरोबर माझा डबा आणला आहे. तुम्ही तुमचे पैसे खर्च करून जेवून घ्या. म्हणजे त्याही वेळी जेवणासाठी फार तर जे 10-20 रुपये लागले असते तेही खर्च करायला हा गृहस्थ तयार नाही. कमाल आहे नाही या माणसाची.’
हे सारं मनात चालत असताना 40-45 मिनिटांच्या प्रवासानंतर तळेगाव आलं. प्लॉटवर पायीच जाता येईल इतका तो प्लॉट बसस्टॉपपासून जवळ होता. आम्ही पोहोचलो.

परंतु आम्ही प्लॉटवर पोहोचण्यापूर्वीच अभिनेते निळू फुले यांच्यासारखा दिसणारा आणि बरोबर तीन-चार जणांची गॅंग असणारा एक गृहस्थ त्या प्लॉटवर येऊन थांबला होता. तो चिथडेकाकांना ओळखत होता. नमस्कार चमत्कार झाल्यानंतर तो निळू फुलेसारखा दिसणारा गृहस्थ चिथडे यांच्याकडे वळत त्यांना म्हणाला, ‘काय चिथडेकाका तुम्ही तुमचा हा प्लॉट विकायला काढलायं म्हणे!’ चिथडेकाका लगेच म्हणाले, ‘हो, विकायला काढलाय.’ त्यावर तो गृहस्थ म्हणाला, ‘मग आम्हाला द्या की, अहो आमच्या प्लॉटला लागून आहे हा प्लॉट. आमचा प्लॉट मोठा होईल ना, जोडून घेता येईल. केवढ्याला द्यायला सांगा तरी!’

त्यावर चिथडेकाका शांतपणे म्हणाले, ‘दहा हजार रुपयांना द्यायचं ठरलं आहे. आम्ही आताच साठेखत स्वत: करून आलो आहोत.’ त्यावर तो निळू फुले यांच्या सारखा दिसणारा माणूस हा गावचा सरपंच आहे हे त्याच्या बरोबर आलेल्या त्याच्या चमच्यांनी मला आणि बरोबरच्या मंडळींना आवर्जून सांगितले. म्हणजे कमी जास्त काही बोलू नका, असा त्याचा अर्थ होता.

तो सरपंच चिथडे काकांना परत म्हणाला, ‘बोला काका, अहो तुम्ही फक्‍त साठेखतच केलं आहे ना! मग ते काय सहज मोडता येतं की हो! आणि मेहेंदळे तुम्हाला केवळ दहा हजारच देणार आहेत ना! बर ते काय इथं या प्लॉटवर घर बांधून राहायला येणार आहेत का? अहो, शक्‍यच नाही. पुणं-मुंबई सोडून ते कशाला येतील तळेगावात! काय!’

असं म्हणून मी काय म्हणतो याची वाट पाहत ते गृहस्थ तसेच थांबले. चिथडेंनी मला बाजूला घेऊन विचारलं ‘काय मेहेंदळे तुम्ही नक्‍की घेणार ना प्लॉट! मी त्यावर त्यांना म्हटले ‘हो, नक्‍की!’

पुन्हा एकदोन वेळा आग’ह करून तो सरपंच म्हणाला, ‘अहो काका! मेहेंदळे तुम्हाला दहा हजारच देणार आहेत ना!’ असं म्हणून त्याचा हात त्याने डोक्‍यावर घातलेल्या गांधी टोपीकडे नेला. त्या टोपीच्या खाली त्यानं आणलेल्या त्या काळातल्या शंभर रुपयांच्या 200 नोटा चिथडे यांच्या पुढ्यात ठेवत तो सरपंच चिथड्यांना म्हणाला, ‘मेहेंदळे तुम्हाला दहा हजार रुपये देणार आहेत ना! हे घ्या चिथडेकाका वीस हजार आहेत. मोजून घ्या.’

चिथड्यांनी मला बाजूला घेऊन पुन्हा तसंच विचारलं, ‘तुम्ही नक्‍की घेणार ना!’ मी पुन्हा तितक्‍याच ठामपणं म्हटलं, ‘हो नक्‍की घेणार.’
त्या सरपंचांनी चिथडे यांना पुन्हा एकदोन वेळा आग्रह करून विचारून दहा ऐवजी वीस हजारांची रक्‍कम आहे अशी आठवण करून देऊन बघितलं. पण माझ्या “मी नक्‍की घेणार’ या अधिवचनानंतर चिथडेकाकांनी त्या सरपंचाच्या त्या वीस हजार रुपयांच्या नोटा शांतपणे पुन्हा त्यांच्याकडे सरकवल्या आणि ते त्याला म्हणाले, ‘नाही नाही, आता व्यवहार झाला आहे आमचा.

तो बदलणार नाही, तुम्ही कृपया निघा’ वीस हजार रुपयांच्या नोटा त्या सरपंचाकडे सरकवताना आम्ही चिथडेकाकांना पाहिलं आणि चाटचं झालो. चालून आलेल्या दहा हजार रुपयांवर (जास्तीच्या) चिथडे नावाचा माणूस पाणी सोडतो आणि तळेगावच्या तिकिटाचा दहा रुपयांचा खर्च आपल्याला करायला लावून वरती साळसूदपणे “मी माझा डबा आणला आहे बरोबर, तुम्ही हॉटेलमध्ये ऑर्डर देऊन जेऊन घ्या आणि पैसे द्या.’ असं आपल्याला सांगतो. या सगळ्याची टोटल कशी करायची हाच विचार माझ्या मनात सुरू होता.

तो सरपंच आणि त्याची ती 4-5 जणांची गॅंग प्लॉटवरून निघून गेल्यानंतर मी गप्पच होतो. मध्यंतरी दहा मिनिटांचा कालावधी गेला असेल नसेल. मला काही राहवलं नाही. मी चिथडेकाकांना बाजूला घेऊन विचारलं, ‘अहो, काका हे कसं काय! तुम्ही मला येताना बसच्या तिकिटासाठी आणि आमच्या तिघांच्या राइसप्लेट करता वीस रुपये खर्च करायला लावले आणि इथं आपण होऊन चालून आलेली 10 हजार रुपयांची जास्तीची लक्ष्मी अव्हेरलीत. हे कसं काय? या साऱ्याची टोटल कशी काय करायची हो!’

त्यावर चिथडेकाका नुसतेच गालातल्या गालात हसले. मी विचारलं, ‘ते कसं काय?’ त्यावर चिथडेकाकांनी दिलेले उत्तर मोठ मार्मिक होतं. ते म्हणाले, ‘प्लॉट तुम्हालाच देईन, असा शब्द दिला होता. म्हणून दहा हजारच घेतले आणि कागदाचा खर्च तुम्ही करायचं हे आपलं ठरलं होतं. म्हणून बसच्या तिकिटाचा दहा रुपयांचा आणि तुमच्या राइसप्लेटचा खर्च तुम्हाला करायला लावला’ तरी बरं चिथडे हे आयुर्विमा महामंडळात नोकरीला होते. ते काही मुंबईतच राहिले तरी पुणेरी माणसासारखा व्यवहारीपणा ते कुठं शिकले होते कुणास ठाऊक!

तळेगावच्या आमच्या या ट्रीपनंतर आठ दिवस गेले असतील. एक दिवस मी असाच ऑफिसला निघालो होतो. वाटेत आमचा सिद्धीविनायकाचा नेहमीचा थांबा आला. चिथडेकाकांची चाळ दिसली. विचार केला दोन मिनिटं चिथडेकाकांना हाक मारू. त्यांच्याकडे अर्धा कप चहा पिऊ आणि मग ऑफिसला जाऊ.
चाळीत शिरताक्षणीच एका घरावर ‘चिथडे’ अशी पाटी दिसली. मी हाक मारली, ‘आहेत का चिथडे काका’ आतून साधारण तिशीची एक बाई भिंतीला धरत धरत बाहेर आली. म्हणाली, मेहेंदळे काका ना! मी विचारलं.

‘तुम्ही कसं काय ओळखल मला’ त्या बाई म्हणाल्या, ‘आम्ही आकाशवाणीवरून तुम्ही बातम्या द्यायचा ना त्या ऐकायचो. तोच आवाज कानात बसला आहे. या… या आत या. काका म्हणजे आमचे वडील. ते घरात नाहीयेत. पण समोरच ते एका डॉक्‍टरांकडे कंपाउंडरचे काम करतात. आम्हाला एलआयसीमधून निवृत्त झाल्यावर पेन्शन वगैरे नव्हती ना! या डॉक्‍टरांकडे काम करताना काकांना साधारण पाऊणशे रुपये मिळतात. तेवढीच मदत होते आम्हाला. तुम्ही दोन मिनिटं बसा. मी लगेच घेऊन येते बघा काकांना…’
आणि खरोखरीच पाचच मिनिटांत चिथडे आले. अंगात कुडता, धोतर, एक अंगठ्याची चप्पल, डोक्‍यावर बेलबुट्ट्याची टोपी आणि चेहऱ्यावर ‘अरे बापरे हे मेहेंदळे आज अचानकपणे कुठे आले आपल्या घरी, असे भाव.

मी म्हटले, ‘नमस्कार! अहो ऑफिसला निघालो होतो, म्हटलं दोन मिनिटं तुमच्या घरात शिरावं, अर्धा कप चहा घ्यावा आणि पुढं ऑफिसला जावं. चिथडे यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदललेले दिसले. आधी त्यांना वाटलं असावं, की, आपण जो परवा जमिनीचा व्यवहार केला तो मोडायला तर मी आलेलो नाही ना! मेहेंदळे यांचा निर्णय तर बदलला नाही ना! परंतु मी आधी केलेल्या खुलाशानं त्यांच्या चेहऱ्यावरील चिंता मिटलेली दिसली आणि त्यांना आतून आवाज आला ‘चहा ठेवला आहे, दोन मिनिटांत आणते.’

पाचच मिनिटांत साधारण पस्तीशीची आणखी एक बाई आतून हातात थरथरणारी कपबशी घेऊन भिंतीला धरत धरत बाहेर आली. चहाचा कप, बशी सकट माझ्या हातात देत चिथडेकाका मला म्हणाले, ‘विश्‍वासराव तुम्हाला ओळख करून देतो. मला दवाखान्यात बोलवायला आली ती माझी धाकटी कन्या आणि चहा घेऊन आली ती थोरली कन्या. दोघीही तिशीच्या पुढे आहेत. अविवाहित आहेत आणि अंध आहेत.’

मी अवाक्‌ होऊन चिथडेकाकांच्याकडे बघतच राहिलो. ‘घ्या चहा घ्या.’ असं म्हणतं चिथडेकाका स्मितहास्य करीत माझ्याकडे बघताहेत हे माझ्या लक्षात येत होतं. कुणाचाच काही उपाय चालू शकणार नाही अशी ती परिस्थिती होती. माझ्या नजरेसमोर मात्र, तळेगावमधल्या प्लॉटवर डोक्‍यावरची टोपी काढत वीस हजार रुपयांच्या नोटा पुढे करणारा तो सरपंच आणि आपण होऊन चालत आलेल्या लक्ष्मीला अव्हेरणारा हा चिथडे नावाचा कुबेर आणि केवळ दिलेल्या शब्दाचं पालन करायचं म्हणून एक नव्हे दोन नव्हे तर त्या काळात दहा हजार रुपयांवर पाणी सोडणारा चिथडे काका दिसत होता. ‘जमीन तुम्हालाच आणि दहा हजार रुपये एवढ्या रकमेत देईन’ असं सांगणारा चिथडे आजच्या काळात मिळेल! चिथडेकाकांच्या पायावर डोकं ठेवून मी नतमस्तक झालो.

त्यांच्या घरातून बाहेर पडताना एकच विचार मनात येत होता. चिथडे यांच्या त्या दोन अविवाहित अंध कन्या पदरात असताना या माणसाला दहा हजार रुपयांना सोडा 10-20 रुपयांचा मोह झाला असता, तरी मी त्याला माफ केलं असतं. नाहीतर आजच्या समाजात राजकीय काय की सामाजिक काय, असलेले नेते आणि माणसं दररोज शब्द देतात आणि रोजच्या रोज तो मोडतात. अशा या समाजात दिलेला शब्द पाळणारे चिथडेकाका म्हणून तर देवासमान किंवा प्रात:स्मरणीय ठरतात ना! नाही का!

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.