मास्क नाही वापरणार? पुणेकरांनी भरला ‘इतका’ दंड, रक्कम वाचून वाटेल आश्चर्य

राज्यातील एकूण कारवाईचा दंडापैकी 70 टक्के दंड पुण्याने भरला

पुणे  – हेल्मेट असो, अथवा मास्क सक्ती पुणेकरांनी एकदा विरोध करायचे मनावर घेतले तर त्यांच्या पुढे प्रशासनाला हातच टेकावे लागतात. करोनाच्या काळात घराबाहेर पडताना मास्क न घातल्याने पुणेकरांना तब्बल 8 कोटी 54 लाख रुपयांचा दंड भरावा लागला आहे. मागील अडीच महिन्यांतच पोलिसांनी हा दंड वसूल केला आहे. यामुळे पुणेकरांच्या मनात करोनाची भीती आहे, की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आकडेवारीचा विचार करता, राज्यात विनामास्क दंड कारवाईच्या 70 टक्के दंड एकट्या पुणे शहरातूनच भरला गेला आहे.

 

पोलिसांनी दि. 2 सप्टेंबर ते 19 ऑक्टोबर या काळात मास्क न घालणाऱ्या 1 लाख 72 हजार 631 जणांकडून तब्बल आठ कोटी 54 लाख 10 हजार 550 रुपयांचा दंड वसूल केला आहे. पुणे शहरात मागील आठ महिन्यांपासून करोनाने ठाण मांडले आहे.

 

राज्य सरकारने सप्टेंबरपासून अनलॉकची प्रक्रिया सुरू केली. यामुळे दुकाने, मॉल सुरू करण्यात आले. प्रवासबंदी हटवण्यात आली. हे करताना या करोना बाधितांची संख्या वाढू नये म्हणून नागरिकांनी सुरक्षित अंतर व मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमांचे पालन करण्याच्या सूचना वारंवार प्रशासनाकडून दिल्या जात आहेत.

 

मात्र, अनेक ठिकाणी नियमांचे पालन केले जात नसल्याचे दिसून येत आहे. घराबाहेर पडताना मास्क बंधनकारक असताना अनेकजण विनामास्क फिरत आहेत. अशा महाभागांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली असून, प्रत्येकी 500 रुपये दंड घेतला जात आहे. पोलीस आणि पुणे महापालिकेच्या आरोग्य विभाग यांच्या मार्फत ही कारवाई केली जात आहे.

 

राज्यात जमा होणाऱ्या मास्कच्या एकूण दंडापैकी 70 टक्के दंड पुण्यात जमा होतो. करोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे, त्यादृष्टीने पोलिसांचे नियोजन सुरू आहे.

– अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.