बावळेवाडीच्या शाळेची थक्क करणारी वाटचाल!

मुख्याध्यापक वारे गुरुजींनी उलगडला प्रवास; 32 मुलांचा पट पोहचला सहाशेवर

नागठाणे – “”एकेकाळी 32 मुले अन्‌ दोन शिक्षकांनिशी असलेली शाळा, आज सहाशेच्या घरात शाळेचा पट, तीस ज्ञानदाते, देशातील पहिली “झिरो एनर्जी स्कूल’, देशातील पहिली टॅबयुक्त शाळा, लोकसहभागातून कोटी रूपयांचा उठाव,” असा वारे गुरुजी बावळेवाडी प्राथमिक शाळेचा प्रवास उलगडत होते.
आरे (ता. सातारा) येथील शिवतेज माध्यमिक विद्यालयात आयोजित एका प्रेरणादायी मुलाखतीद्वारे श्री. वारे या विलक्षण कामगिरीची माहिती देत होते.

मुलाखत होती दत्तात्रय वारे या किमयागाराची. पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडी (ता. शिरूर) या प्राथमिक शाळेचे ते मुख्याध्यापक. कुमठे विभागातील शिक्षकांसाठी विस्तार अधिकारी प्रतिभा भराडे यांच्या प्रयत्नाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी वारे गुरुजींचा थक्क करणारा प्रवास ऐकताना सर्वच शिक्षक मंत्रमुग्ध झाले.

एकेकाळी शाळेचा पट 32 होता. दोन शिक्षक शाळेत कार्यरत होते. मात्र मनात इच्छाशक्ती असेल, काहीतरी करुन दाखविण्याची जिद्द असेल, ग्रामस्थांचा विश्‍वास असेल तर एखाद्या शाळेचा कसा कायापालट होऊ शकतो, हे वाबळेवाडीकरांनी दाखवून दिले. आज या शाळेत सुमारे चार हजार विद्यार्थी प्रवेशासाठी इच्छुक आहेत. राज्यातील हजारो शिक्षक, पालक शाळेस भेट देतात. इतकेच नव्हे, तर अलीकडच्या काळात स्वीडीश शिक्षणतज्ज्ञांनीही या शाळेस भेट दिली.

शाळेसाठी अमेरिकेतील न्यूयॉर्क बॅंकेने आठ वर्गखोल्या बांधून दिल्या आहेत. वातानुकूलित वर्ग, सौर ऊर्जा, वायफाय, बोटॅनिकल गार्डन आदी शाळेची वैशिष्ट्‌ये बनून गेली असल्याचे श्री. वारे यांनी स्पष्ट केले. मधुकर जगदाळे यांनी स्वागत केले. केंद्रप्रमुख रवींद्र भंडारे यांनी आभार मानले. या वेळी सुमारे 150 शिक्षक उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)