कलंदर: न हरवताच जिंकले

उत्तम पिंगळे

परवा विसरभोळे सरांकडे गेलो तर आषाढी व गुरूपौर्णिमा विषय झाला व गाडी थेट क्रिकेटवर आली. क्रिकेट म्हणजे सरांचा वीक पॉइंट. मी त्यांना कित्येक वेळा विचारायचो की, सर आपण तर खरे अर्थशास्त्राचे प्राध्यापक व आपणास माहीतच आहे की क्रिकेट किती देशात खेळले जाते तरीही आपल्याला कसे काय ते आवडते? त्यावर ते हसून म्हणायचे की, बालपण क्रिकेटमय वातावरणात गेले त्यामुळे त्याची आवड निर्माण झाली आणि तसाही क्रिकेटमध्ये भरपूर पैसा आहे. तसा तर आपला राष्ट्रीय खेळ हॉकी आहे; पण हॉकीला गर्दी असते का क्रिकेटला गर्दी असते तर तुम्हीच पाहा.

पण असे हे क्रिकेटप्रेमी प्राध्यापक या विश्‍वचषक सामन्याच्या शेवटच्या सामन्याबाबत तावातावाने बोलत होते. त्याची सुरुवात त्यांच्या वेळापत्रकावरूनच झाली. वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धा असताना प्रत्येक साखळी सामन्यासाठी सुद्धा एक अतिरिक्‍त दिवस ठेवायला हवा होता. म्हणजे पाऊस पडला तर सामना दुसऱ्या दिवशी खेळला जाईल आणि त्याही दिवशी तर पाऊस पडला तरच एक एक गुण दिला जावा. तसेच कोणत्याही निर्णयाबाबत थोडीजरी शंका असेल तरी तिसऱ्या पंचांची मदत घेतली जावी. “इफ डाउट प्लीज आस्क’, असे सर्वच पंचांना सांगितले गेले पाहिजे होते.

तसे पाहिले तर विश्‍वचषकाचे शेवटचे तीनही सामने म्हणजे दोन उपांत्य व अंतिम सामना अगदी इर्ष्येने खेळले गेले. गोलंदाजी व क्षेत्ररक्षण अप्रतिमच होते म्हणूनच सर्व सामन्यांमध्ये दोनशे पन्नास ही धावसंख्या कुणीही गाठली नाही. अशा वेळी एक एक धाव महत्त्वाची असते आणि कोणत्याही कारणाने जर निर्णय चुकीचा गेला तरीही फरक पडू शकतो. आज जो ओव्हर थ्रोमुळे वाद चालू आहे तो निर्णय देण्यापूर्वी जर तिसऱ्या पंचाकडे विचारणा केली असती तर असे झाले नसते.

नियमानुसार ओव्हर थ्रो वेळी पूर्ण झालेल्या धावा व ओव्हर थ्रोच्या (या ठिकाणी चार धावा) अशा पाच धावाच द्यायला हव्या होत्या. पण थ्रो करतेवेळी पूर्ण न झालेली व नंतर पूर्ण केलेली दुसरी धावही दिली गेली. म्हणजे पाचऐवजी सहा धावा दिल्या गेल्या आता येथेच पारडे फिरले म्हणायचे का? तर या ठिकाणी तरी नक्‍कीच त्यास तसे म्हणण्यास जागा आहे. कित्येक वेळा पंचांच्या हातून चुका होतात शेवटी तोही माणूसच आहे. नोबॉल असताना तो दिला न जाणे वगैरे. पण शेवटी सर्व जण म्हणतात की, “इट्‌स पार्ट ऑफ द गेम’.

सर म्हणाले की, हे सर्व ठीक आहे पण नियम बनवताना काही सारासार विचार केला गेला आहे की नाही? अंतिम सामना सुपर ओव्हरपर्यंत गेला, सर्वांचे श्‍वास रोखले गेले व तेथेही दोन्ही संघांनी 15 धावा केल्या म्हणजे बरोबरीच झाली. मग नियमानुसार ज्या संघाने जास्त चौकार मारले त्याला घोषित केले गेले, या नियमांवर सर्वत्र उलटसुलट चर्चा होत आहे. सोशल मीडियावरही कित्येक जोक्‍स येत आहेत. प्राध्यापकांना याचे वाईट वाटत आहे की नियम बनवते वेळी थोडा तरी विचार करावयास नको का? सुपर ओव्हर टाय झाली तर मग थोडी पंधरा-वीस मिनिटे विश्रांती देऊन पुन्हा एक सुपरओव्हर खेळली गेली असती तर काय बिघडले असते? टेनिससारखी वैयक्‍तिक मॅचही कित्येक काळ लांबत असते. बरं जास्त चौकारांसारखा फालतू नियम ठेवण्यापेक्षा ज्या संघांनी कमी बळी गमावले आहेत तो विजयी घोषित करणे जास्त योग्य ठरले असते. न्यूझीलंडने आठ गडी गमावले होते तर इंग्लंडचा संघ पूर्ण बाद झाला होता आणि मॅच टाय झाली होती. चौकारांपेक्षा गडी कुणाचे कमी बाद झालेले हे महत्त्वाचे होते. म्हणूनच सर म्हणतात की “इंग्लंड भले जिंकले पण न्यूझीलंड मात्र हरले नाही’. आपणांस काय वाटते?

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)