जागतिक लहान मुलांचा कर्करोग दिनविशेष
पुणे – ‘आराध्या!’, (नाव बदलले आहे) चार वर्षांची अतिशय चुणचुणीत, मिश्किल मुलगी. परंतु पायाचा तळवा दुखण्याचे निमित्त झाले आणि त्यावरील उपचारानंतर तिला “ब्लड कॅन्सर’ झाल्याचे निष्पन्न झाले. आपल्याला काय झाले हे न समजण्याचे तिचे वय, परंतु आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. आणि तेथून सुरू झाला तिचा आणि आई-वडिलांचा “ब्लड कॅन्सर’विरुद्ध लढाईचा प्रवास. आज ही लढाई आराध्याने जिंकली आहेच. परंतु एक आनंदी जीवनही त्याबरोबर कसे जगता येईल याचा एक वस्तुपाठ तिने घालून दिला आहे.
पायाचा तळवा दुखण्यावर अनेक उपाय करून झाल्यानंतर “रक्त तपासणी’ करण्याचा सल्ला लहान मुलांच्या डॉक्टरांनी आराध्याच्या आई-वडिलांना दिला. त्यात तिला “ल्युकेमिया’ झाल्याचे निष्पन्न झाले, आणि तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील सहा महिने तिच्यावर केमोथेरपीचे उपचार सुरू होते. एवढ्या लहान वयात तिची “स्थितप्रज्ञता’ पाहून डॉक्टर, अन्य वैद्यकीय स्टाफ यांना आश्चर्य वाटलेच; परंतु उपचारांना शांतपणे साथ देत तिनेच उलट आई-वडिलांना एकप्रकारे मानसिक धीर दिला.
वास्तविक केमोथेरपी घेताना अनेक रुग्ण डिप्रेशनमध्ये जातात, मानसिक संतुलन बिघडते वगैरे परंतु आराध्याने तो धनुष्यही अतिशय कणखरपणे पेलला, त्यामुळेच रुग्णालयातही ती सगळ्यांची लाडकी झाली. औषध-गोळ्या वेळेवर घेण्याची आणि आईलाच विश्रांती देऊन स्वत: औषधांची आठवण ती करायची असे तिच्या आईने सांगितले.
या सगळ्या काळात तिची शाळा बुडाली. परंतु आज तिच्या धैर्याने तिने मोठ्या आजारपणावर मात केली आहे. तिच्यासारखे असे अनेक बाळ, लहान मुले आहेत जी या व्याधीने ग्रस्त आहेत; तरीही ते हसत जगण्याची धडपड करत आहेत, त्या सगळ्या छकुल्यांना सलाम!
योग्य उपचारानंतर 70-80 टक्के बालके बरी होतात
15 फेब्रुवारी हा दिवस “जागतिक लहान मुलांचा कर्करोग दिन’ म्हणून पाळला जातो. व्यसनाधिनता, चुकीची लाइफस्टाइल अशी अनेक कारणे कर्करोग होण्यासाठी दिली जातात. परंतु एवढ्या लहान मुलांना ही कारणे लागूच होत नाहीत. त्यामुळे त्यांना कर्करोग होण्याचे नेमके कारण आजपर्यंत कोणालाही स्पष्टपणे देता आले नाही. सतत ताप येणे, वजन-रक्त कमी होणे, शरीरात गाठी होणे, लाल डाग येणे, पोट फुगणे आदी लक्षणे आढळतात. मुलांमध्ये रक्ताचा कर्करोग म्हणजे “ल्युकेमिया’ आणि “लाइमफोमा’ सर्वात जास्त आढळतो. या व्यतिरिक्त मेंदू, मूत्रपिंड, यकृत, हाडांचा असे विविध कर्करोग होऊ शकतो. लहान मुलांचा कर्करोग प्रौढाच्या कर्करोगापेक्षा वेगळा असतो. हा संसर्गजन्य किंवा अनुवंशिक आजार नाही. मोठ्या व्यक्तींच्या तुलनेत लहान मुलांच्या कॅन्सरचे ठीक होण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. योग्य उपचारानंतर 70-80 टक्के बालके बरी होतात.