शारजा – सुन लुस, सुषमा वर्मा आणि वेदा कृष्णमूर्ती यांच्या फलंदाजीच्या जोरावर वेलॉसिटीने महिलांच्या आयपीएल चॅलेंज स्पर्धेत सुपरनोव्हाजचा 5 गडी राखून पराभव करत विजयी सलामी दिली.
सुपरनोव्हाजच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेलॉसिटीच्या सुन लुसने 37, सुषमा वर्माने 34 व वेदा कृष्णमूर्तीने 29 धावांची खेळी करत संघाला सोपा विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील सुपरनोव्हाज संघाने वेलॉसीटीविरुद्धच्या लढतीत 8 बाद 126 अशी समाधानकारक धावसंख्या उभारली. वेलॉसिटीच्या जहांआरा आलमने चामरा अटापट्टू व कर्णधार हरमनप्रीत यांना बाद करत सुपरनोव्हाजवर वर्चस्व राखले.
वेलॉसिटीची कर्णधार मिताली राजने नाणेफेक जिंकत सुपरनोव्हाजला फलंदाजीसाठी पाचारण केले. या सामन्यात जवळपास सात महिन्यांच्या खंडानंतर खेळताना खेळाडूंना संमिश्र यश मिळत असल्याचे दिसून आले. चामरी अटापट्टू व कर्णधार हरमनप्रीत यांनी मात्र, जबाबदारीने फलंदाजी केली. त्या स्थिरावल्यानंतरही अनावश्यक फटका मारून बाद झाल्याने सुपरनोव्हाजला 20 षटकांत 8 बाद 126 अशीच मजल मारता आली.
वेलॉसिटीची अव्वल गोलंदाज जहांआरा आलमने या दोघींना बाद करत मोठा अडसर दूर केला. अटापट्टूने 39 चेंडूत 2 चौकार व 2 षटकार फटकावताना 44 धावांची खेळी केली. हरमनप्रीतने 27 चेंडूंचा सामना करताना 1 चौकार व 2 षटकार यांच्या मदतीने 31 धावा केल्या. त्यानंतर शशिकला सीरीवर्धनेची 18 धावांची उपयुक्त खेळी वगळता त्यांच्या अन्य फलंदाजांना अपयश आले.
वेलॉसिटीच्या एकता बिश्तने सुपरनोव्हाजच्या तळातील फलंदाजांना बाद करत त्यांच्या धावसंख्येवर अंकुश ठेवला. मात्र, त्यापूर्वी आलमसह लेह कासपेरेकनेही दोन गडी बाद करत त्यांच्या प्रमुख फलंदाजांना मोठी खेळी करण्यापासून रोखले.
संक्षिप्त धावफलक :
सुपरनोव्हाज – 20 षटकांत 8 बाद 126 धावा. (चामरी अटापट्टू 44, हरमनप्रीत सिंग 31, शशिकला सीरीवर्धने 18, एकता बिश्त 3-22, लेह कासपेरेक 2-23, जहांआरा आलम 2-27).
वेलॉसिटी – 19.5 षटकांत 5 बाद 129 धावा. (सुन लूस 37, सुषमा वर्मा 34, वेदा कृष्णमूर्ती 29, याबोंगा खाका 2-27,).