शारजा – अमिरातीत आजपासून महिलांच्या मिनी आयपीएल स्पर्धेला आजपासून प्रारंभ होत आहे. स्पर्धेतील सलामीचा सामना सुपरनोव्हा आणि व्हेलॉसीटी या संघात रंगणार आहे. सुपरनोव्हाजचे नेतृत्व हरमनप्रीत सिंगकडे तर, व्हेलॉसीटी संघाचे नेतृत्व मिताली राजकडे असून भारताच्या महिला संघातील या दोन खेळाडू सलामीच्या सामन्यांत एकमेकींविरोधात उभ्या ठाकणार आहेत.
स्पर्धेतील तिसरा संघ ट्रायलब्लेझर्स असून त्याचे नेतृत्व स्मृती मानधनाकडे सोपवण्यात आले आहे. यंदा ही स्पर्धा याच तीन संघात होणार असून स्पर्धेतील अंतिम सामना 9 नोव्हेंबरला होणार आहे.
या स्पर्धेत भारताच्या महिला संघातील खेळाडूंसह इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका व बांगलादेश या देशांचे खेळाडू देखील या तीन संघातून खेळणार आहेत.
सुपरनोव्हा संघात हरमनच्या नेतृत्वाखाली जेमिमा रॉड्रीग्ज, प्रिया पुनिया, अनुजा पाटील, राधा यादव, पूनम यादव या भारतीय खेळाडूंसह चमरा अटापट्टू, शशिकला सीरीवर्धने शकेरा शेल्मन, आयबेंका खाका व मुस्कान मलिक या परेदशी खेळाडू खेळणार आहेत. दुसरीक़डे मितालीच्या नेतृत्वाखाली वेदा कृष्णमूर्ती, शेफाली वर्मा, सुषमा वर्मा, एकता बिश्त, शिखा पांडे, देविका विद्या या भारतीय खेळाडूंसह केसपेरेक, डॅनियल वॅट, सुन लुस, जहांआरा आलम व एम. अनागा या परदेशी खेळाडू खेळणार आहेत. 4 ते 9 नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणार असून तीन संघात ज्या दोन संघाचे गुण सरस ठरतील त्या संघात अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे.
गेले अनेक वर्षे अशी स्पर्धा आयोजित करण्याची मागणी भारताच्या महिला क्रिकेटपटू करत होत्या. गेले दोन वर्षे प्रदर्शनिय सामने खेळवले जात होते. मात्र, महिलांची विशेष आयपीएल स्पर्धा आयोजित करण्यात येत नव्हती. यंदा बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी पुढाकार घेतला व ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आता येत्या काळात या स्पर्धेची व्यप्ती वाढवण्यात येणार असून जास्तीतजास्त संघ तयार करत भारतासह परदेशातील संघांच्या खेळाडूंसाठी नवे पर्याय उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
थायलंडची एकमेव खेळाडू
महिलांच्या आयपीएल स्पर्धेत सहभागी देशांच्या खेळाडूंसह यंदा थायलंडच्या नाथाकान चंथाम या खेळाडूनेही सहभाग घेतला आहे. ती स्पर्धेत सहभागी होणारी थायलंडची पहिलीच खेळाडू ठरली आहे.मानधनाच्या नेतृत्वाखालील ट्रायलब्लेझर्स संघाकडून ती या स्पर्धेत खेळणार आहे.