#महिला_दिन_विशेष : “घे भरारी’…

आज जागतिक महिला दिन. सर्वत्र हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. महिलांचा सत्कार, सन्मान करण्यासाठी आज अनेक संस्था पुढे येत आहेत. आपण कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत, हे महिलांनी कार्यकतृत्वाने क्षणोक्षणी सिध्द करून दाखवले आहे. समाजकारणापासून राजकारणापर्यंत प्रत्येक क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. अबला असणारी स्त्री आज सबला बनली आहे. फक्‍त चूल आणि मूल या गर्तेत न अडकता यशाच्या उंच टप्प्यावर पोहोचल्या आहेत. जगाच्या पाठीवर महिलांना विविध क्षेत्रात मिळालेल्या संधीचे त्या सोने करत आहेत. अशा महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा घेतलेला आढावा….

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दि. 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जात आहे. महिला विविध क्षेत्रात आघाडीवर आहेत त्या चांगले शिक्षण घेत आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन अनेक क्षेत्रात कार्यरत आहेत. एवढेच नव्हे तर काही क्षेत्रांमध्ये महिला पुरुषांपेक्षाही पुढे आहेत. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रात यशाच्या उंच टप्प्यावर जाऊन पोहोचलेल्या आहेत. जागतिक महिला दिन हा महिलांचा दिवस. म्हणजे जगाच्या निम्म्या लोकसंख्येचा दिवस. ही लोकसंख्या तिच्यात कर्तबगारीची धमक असून सुध्दा उपेक्षित आहे.

या महिलांना हा समाज संधीच देत नाही. मात्र, महिलांना संधी दिली तर ती महिला काय करू शकते, हे लक्षात येते. परंपरेने, धर्माने, रूढीने आणि समाजाच्या पुरुषप्रधान वागणुकीमुळे निम्मी मानवता, अशी उपेक्षित राहिलेली आहे. तरीही मानवप्राणी स्वतःला प्रगत समजतो. ही खरी दुर्दैवाची बाब आहे. आपण आपल्या आसपास पाहिल्यावर असे लक्षात येते की महिलांना ज्या ज्या क्षेत्रात संधी मिळाली त्या त्या सगळ्या क्षेत्रात महिलांनी आपले वेगळेपण सिध्द करून दिले आहे.

काही शैक्षणिक क्षेत्रात मुलांच्या आणि मुलींच्या प्रगतिचा तुलनात्मक विचार केला तर मुली मुलांपेक्षा आघाडीवर आहेत. नवरा-बायको दोघेही नोकरी करतात. परंतु, नवरा नोकरीशिवाय काहीच करत नाही. बायको मात्र नोकरीही करते आणि घरची कामेही करते. तिला स्वातंत्र्य दिल्याचा आव आणणारा तिचा नवरा आपली बायको नोकरी करत आहे, तेंव्हा आपण तिच्याबरोबर स्वयंपाकही केला पाहिजे, असे चुकून सुद्धा म्हणत नाही.

स्वयंपाक तर लांबच राहिला, परंतु, घरकामात मदत करणे एवढे साधे काम सुद्धा तो टाळतो, असे एखादे घरचे काम केले तर आपल्या मर्दपणाला बाधा येईल, अशी भीती त्याला वाटत असते. म्हणजे बायकोला नोकरीवर सोडणारा नवरा समानतेचा विचार करून पत्नीला स्वातंत्र्य देत नाही.तर घरात डबल उत्पन्न यावे म्हणून देत असतो, असे म्हंटले तर वावगे होणार नाही. परंतु, गरजा आणि महागाई वाढल्याने डबल इंजिनची आवश्‍यकता आहे, हे मात्र मान्य करावे लागेल.

स्त्रीला समाजात स्त्री म्हणून एक वेगळे स्थान, मानसन्मान, आब, ज्ञान, आदर जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत तिची अशीच परिस्थिती राहणार. ती घराबाहेर सुरक्षित नाही. जोपर्यंत मनोवृत्तीत आणि इच्छाशक्तीत सकारात्मक आणि प्रामाणिक बदल घडत नाही, तोपर्यंत महिला सुरक्षित होणार नाहीत. स्त्रियांना समता आणि स्वातंत्र्य पाहिजे असेल तर पुरुषांच्या वर्चस्वाचा अहंगंड कमी झाला पाहिजे. परंतु, तो कमी होत नाही.

महिला दिन पाळला जातो, चर्चा होतात, परिसंवाद होतात आता तर महिला दिनाला कर्तबगार महिलांचा सत्कार केला जातो. परंतु भविष्यात महिलांना समानतेने वागणूक दिली जाईल का नाही ते काळच ठरवेल. परंतु, महिलांनी सजग राहणे आजच्या कळतात खूप खूप गरजेचे आहे. आजच्या महिला दिनी समाजातील प्रत्येक घटकाने महिलांचा सन्मान करावा अशा पध्दतीने आपले वर्तन ठेवणे काळाची गरज आहे.

सुरेश डुबल
कराड

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.