महिला विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धा : फ्रान्स उपांत्यपूर्व फेरीत

व्हॅलेंसिनीस (फ्रान्स) – अमांडिनी हेनी हिने 106 व्या मिनिटाला केलेल्या सुरेख गोलामुळेच फ्रान्सने ब्राझील संघाला 2-1 असे हरविले आणि महिलांच्या विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले.

शेवटपर्यंत रंगतदार झालेल्या या सामन्यात मध्यंतरापर्यंत गोलफलक कोराच होता. पूर्वार्धात फ्रान्सच्या व्हॅलेरी गौविन हिने हेडींग करीत गोल केला होता. तथापि ब्राझीलच्या खेळाडूंनी या गोलबाबत घेतलेला आक्षेप पंचांनी मान्य केला. त्यामुळे फ्रान्सचा हा गोल अमान्य करण्यात आला. मध्यंतरानंतर गौविन हिने कॅडिडितौ हिने दिलेल्या पासवर शानदार गोल केला व संघाचे खाते उघडले. फ्रान्सला या गोलाचा आनंद फार वेळ घेता आला नाही. ब्राझीलच्या किस्तीयानो हिने गोल करीत 1-1 अशी बरोबरी साधली.

या बरोबरीतच सामना संपल्यानंतर अलाहिदा वेळ देण्यात आली. 106 व्या मिनिटाला हेनी हिने गोल करीत संघाची विजय खेचून आणला. अमेरिका व स्पेन यांच्यातील विजेता संघ उपांत्यपूर्व फेरीत फ्रान्सबरोबर खेळणार आहे.

स्पर्धेतील अन्य सामन्यात इंग्लंडने कॅमेरून संघाचा 3-0 असा पराभव केला व उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्यांच्याकडून कर्णधार स्टेफी हॉटन, एलीन व्हाईट व ऍलेक्‍सा यांनी हे गोल केले. पूर्वार्धात त्यांनी 2-0 अशी आघाडी घेतली होती. उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंडची नॉर्वे संघाशी गाठ पडणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.