इंदापूर, (प्रतिनिधी) – इंदापूर मतदार संघाचा आमदार या नात्याने मी तुमच्या उमेद अभियानातील सर्व महिलांच्या पाठीशी खंभीरपणे उभा आहे.
तालुक्यातील एकूण 7 जिल्हा परिषद गटातील 7 महिला प्रभाग संघांना प्रशासकीय कामकाज करणेसाठी अद्ययावत कार्यालय उभारणेसाठी प्रत्येकी 30 लाखप्रमाणे एकूण 2 कोटी 10 लाख रुपयांचा निधी तात्काळ जिल्हा परिषदेच्या डिपीडीसी योजनेमधून देणार असल्याची घोषणा राज्यांचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांनी केली.
इंदापूर पंचायत समितीच्या उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने, पंचायत समितीच्या कर्मयोगी शंकरराव पाटील सभागृहात तालुक्यातील महिला स्वयंसहाय्यता समूहांना बँक कर्ज वाटप मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
यावेळी आमदार दत्तात्रय भरणे आणि पंचायत समिती इंदापूरचे गटविकास अधिकारी सचिन खुडे यांच्या हस्ते एकूण 112 महिला स्वयंसहाय्यता समूहाना एकूण 4 कोटी 4 लाख 83 हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले.
यावेळी बचत गटातील महिलांना मार्गदर्शन आमदार दत्तात्रय भरणे करत होते. या कार्यक्रमात बँक ऑफ महाराष्ट्र 1 कोटी 88 लाख, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 35 लाख, आयसीआयसीआय बँक 45 लाख, बँक ऑफ इंडिया 60 लाख, एचडीएफसीबँक 65 लाख, महाराष्ट्र ग्रामीण बँक 9 लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले.
आमदार भरणे म्हणाले की, एवढ्या मोठ्या घेतलेल्या बँक कर्जातून तुम्ही स्वतःची ओळख निर्माण करून, तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहा. इंदापूर मतदार संघाचा आमदार या नात्याने मी तुमच्या उमेद अभियानातील सर्व महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील.
प्रास्ताविक करताना गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी उपस्थित महिलांना उमेद अभियानाच्या माध्यमातून घेतलेल्या कर्जातून विविध उपजीविका सुरु करून, आपले कुटुंब आर्थिक सक्षम करा असे आवाहन खुडे यांनी केले.
यावेळी युवा नेत्या अनुष्का भरणे, पुणे जिल्हा बँकेचे बारामती विभागाचे विभागीय अधिकारी आनंदराव थोरात, तालुका अभियान व्यवस्थापक सचिन बाबर, तालुका व्यवस्थापिका राणी ननवरे, आदित्य मांधळे,
समाधान भोरकडे, प्रभाग समन्वयक डी. जे. राऊत, अमर कदम, चेतन रांजनकर, सुनीता दातखिळे, निर्मला निमगिरे, सर्व बँकेचे शाखाधिकारी, बँक सखी, व महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. जे. राऊत यांनी केले तर समाधान भोरकडे यांनी आभार मानले.