पुण्यात रंगणार महिलांची टी-20 लीग

पुनित बालन ग्रुपतर्फे 21 डिसेंबरपासून आयोजन

पुणे – पुनित बालन ग्रुपतर्फे पाचव्या पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग अजिंक्‍यपद टी-20 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 21 ते 27 डिसेंबर या कालावधीत मुंढवा येथील लिजंडस्‌ स्पोर्टस्‌ क्‍लब मैदानावर होणार आहे. 

या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना स्पर्धेचे संचालक आणि पुनित बालन ग्रुपचे सर्वेसर्वा पुनित बालन यांनी सांगितले की, केवळ महिला खेळाडूंसाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत एकूण 6 निमंत्रित संघ सहभागी झाले आहेत. गेले चार वर्ष महिलांसाठीची ही स्पर्धा आयोजित करण्यात येते आणि या वर्षी स्पर्धेचे हे पाचवे वर्ष आहे.

महाराष्ट्रातील सर्वोत्तम महिला खेळाडू या स्पर्धेत आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. पुनित बालन ग्रुपने स्पर्धेला प्रायोजकत्व दिले आहे. साखळी आणि बाद फेरीमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत एचपी सुपरनोव्हाज्‌, लिजेंडस्‌ पॅंथर्स, कुंतीविमलजी स्टार्स, ऑक्‍सिरिच स्मॅशर्स, निंबाळकर रॉयल्स्‌, सिम्हा वॉरीयर्स या सहा निमंत्रित संघांमध्ये विजेतेपदाची चुरस पहावयास मिळणार आहे.

सात दिवस चालणाऱ्या या स्पर्धेच्या संघांची आणि खेळाडूंची निवड लिलावाने करण्यात आली. हा लिलाव रोख रक्कमेचा नव्हता तर, गुण पध्दतीचा होता. 90 खेळाडूंची गुणपध्दतीने सहा संघांमध्ये विभागणी करण्यात आली. महाराष्ट्राची खेळाडू शिवाली शिंदेला (47 हजार गुणांनी) ऑक्‍सिरीच स्मॅशर्स संघाने आपल्या संघामध्ये समाविष्ट करून घेतले आहे. श्रध्दा पोखरकर हिला 35 हजार 500 गुणांनी निंबाळकर रॉयल्स्‌ संघाने तर, कोल्हापूरच्या ऋतुजा देशमुख हिला 30 हजार गुणांनी लिजेंडस्‌ पॅंथर्स संघाने आपल्या संघात समाविष्ट करून घेतले आहे.

या स्पर्धेचे उद्‌घाटन 21 डिसेंबर रोजी माणिकचंद ऑक्‍सिरिचच्या कार्यकारी संचालक जान्हवी धारीवाल आणि महाराष्ट्राचा रणजीपटू व आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज्‌ संघाचा खेळाडू ऋतुराज गायकवाड यांच्या हस्ते होणार आहे. या स्पर्धा आयोजनामध्ये कोविड-19 सुरक्षेचे सर्व नियम आणि खेळाडूंच्या सुरक्षिततेचे पालन करण्यात येणार आहे.

विविध पारितोषिके देण्यात येणार 

स्पर्धेतील विजेत्या संघाला व उपविजेत्या संघाला करंडक मिळणार आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक याबरोबरच मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर अशी पारितोषिके देण्यात आहेत. तसेच 15 वर्षाखालील महिला खेळाडूला उदयोन्मुख खेळाडू असे विशेष पारितोषिकही देण्यात येणार आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.