कोपरगाव, (प्रतिनिधी) – गणेशोत्सवानिमित्त संजीवनी स्वयं सहाय्यता महिला बचत गटाने आयोजित केलेला सन्मान नारीशक्तीचा होम मिनिस्टर कार्यक्रम वारी येथे संपन्न झाला.
संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुकाताई कोल्हे यांच्या उपस्थितीत वारी व परिसरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने हजर होत्या.
खेळ पैठणीचा कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संजीवनी महिला बचत गटाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला महिलांची तुफान गर्दी झाली होती.
श्री गणराया हे स्री शक्तीला मानाचे स्थान देणारे देवता आहे. महिलांची शक्ती ओळखून रिद्धी व सिध्दी यांना दिलेले स्थान आपण जाणतो.
महिला या बुद्धिमत्ता आणि कर्तुत्वाने कुठेही कमी नसून त्यांच्या पाठीशी सर्वांनी उभे राहून संधी देणे ही सामाजिक जबाबदारी आहे.
केवळ घरकाम करने हे स्रीचे क्षेत्र नसून प्रत्येक क्षेत्रात अभिमान वाटेल असे काम आज महिला करता आहेत. स्नेहलता कोल्हे यांनी अनेक विकासकामे वारी गावात केली. विवेक कोल्हे देखील जनसामान्यांचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी सतत अग्रेसर आहेत.
कारण सेवा हाच मोठा धर्म मानून आम्ही चालतो आहोत, असे रेणुका कोल्हे म्हणाल्या. कोल्हे कुटुंबाने घेतलेल्या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने आपण उपस्थित असणे हे एक प्रकारे जगदंबा मातेचे आशीर्वाद आहेत, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
प्रा.गणेश कांबळे आणि सुमित काळोखे यांनी या कार्यक्रमात आपल्या अनोख्या शैलीने रंगत आणली. महिलांना विविध मनोरंजक प्रश्नोत्तरे, उखाणे, खेळ यातून वातावरण अगदी आनंदमय झाले होते. यावेळी वारी आणि पंचक्रोशीतील महिला भगिनी, मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.