पुणे – शहरात महिलांचे दागिने हिसकावणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. बाणेर, धनकवडी, लोहगाव भागांत दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलांचे दागिने हिसकावून नेल्याच्या घटना घडल्या.
याबाबत एका ज्येष्ठ महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
तक्रारदार महिला लोहगावमधील खेसे पार्क परिसरात राहायला आहे. दोन दिवसांपूर्वी सायंकाळी त्या सोसायटीच्या आवारातून निघाल्या होत्या. त्यावेळी दुचाकीस्वार चोरट्याने त्यांच्या गळ्यातील 80 हजारांची सोनसाखळी हिसकावून नेली.
धनकवडीतील स्वामी समर्थ सोसायटीत महिलेची सोनसाखळी हिसकावून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी मनोज ऊर्फ आशिष धोडिंबा भोंडवे (26, रा. धनकवडी) याला अटक केली. याबाबत महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलीस उपनिरीक्षक बुनगे तपास करत आहेत.
दरम्यान, बाणेर रस्त्यावर शनिवारी सकाळी पादचारी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेली. गेल्या महिनाभरापासून शहरात महिलांचे दागिने हिसकावण्याच्या घटना वाढल्या आहेत. पादचारी महिलांचे मोबाइल संच हिसकावून नेल्याच्याही घटना घडल्या आहेत.