महिलांची आयपीएल लवकरच – गांगुली

मुंबई – आयपीएल स्पर्धा महिला क्रिकेटपटूंसाठीही आयोजित केली जावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होती. मात्र, आता याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, अशे आश्‍वासन बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिले आहे.

जेव्हापासून पुरुषांच्या आयपीएलला प्रारंभ झाला तेव्हापासूनच महिलांसाठीही ही स्पर्धा घेता येईल का? यावर तत्कालीन सदस्यांनी विचार सुरू केला होता. मात्र, प्रत्येक वेळी काही ना काही कारणाने या स्पर्धेबाबत धोरणात्मक निर्णय झाला नाही. आता गेल्या काही वर्षांपासून महिला क्रिकेटची प्रगती होताना दिसत असून देशाच्या संघाला सातत्याने नवी गुणवत्ता मिळावी यासाठी लवकरच महिलांची आयपीएल स्पर्धा देखील आयोजित केली जावी, या प्रस्तावावर सर्व सदस्यांचे एकमत आहे. त्यामुळे येत्या काळात सर्व आराखडा तयार केला जाईल व या स्पर्धेचा शुभारंभ होइल, असेही गांगुली यांनी स्पष्ट केले आहे.

महिला क्रिकेटपटूंकडून स्वागत

भारतातील महिला क्रिकेटपटूंसाठीदेखील आयपीएल स्पर्धा घेण्यात यावी, अशी मागणी आम्ही गेली अनेक वर्षे करत होतो. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याबाबत ठामपणे निर्णय घेण्याचे जाहीर केल्यामुळे खूप आनंद झाला आहे. आता येत्या काळात या स्पर्धेचे प्रत्यक्ष आयोजन झाल्यावरच त्याची उपयुक्तता सिद्ध होइल. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघातून अनेक खेळाडूंना खेळण्याची संधी मिळेल व देशाच्या संघाला नवी गुणवत्ताही गवसेल व सेकंड बेंचही मिळेल, अशा शब्दात भारताच्या महिला क्रिकेट संघाची एकदिवसीय सामन्यांतील कर्णधार मिताली राज हिने आपला आनंद व्यक्त केला आहे. मितालीसह पूनम यादव, स्मृती मानधना तसेच अन्य महिला क्रिकेटपटूंनीही गांगुली यांच्या दृष्टिकोनाचे स्वागत केले आहे.

नोव्हेंबरमध्ये होणार स्पर्धा

महिलांची आयपीएल स्पर्धा येत्या 1 ते 10 नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात येण्याची शक्‍यताही सूत्रांनी व्यक्त केली असून त्यापूर्वी महिला क्रिकेटपटूंसाठी सराव शिबिरही आयोजित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर भारताचा महिला क्रिकेट संघ येत्या ऑक्‍टोबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तर, त्यानंतर आयपीएल व लगेचच वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.