महिलांची आयपीएल स्पर्धा व्हावी – मानधना

मुंबई – महिलांची देखील आयपीएल सुरू व्हावी अशी अपेक्षा भारताच्या आजी माजी खेळाडूंनी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने मागणी केलेली आहे. त्यात आता स्टार खेळाडू स्मृती मानधनानेदेखील समर्थन दिले असून किमान पाच ते सहा संघांत का होईना पण देशाला नवनवीन खेळाडू गवसतील यासाठी तरी ही स्पर्धा सुरू करावी, अशी मागणी केली आहे.

या स्पर्धेतून पुरुष संघाप्रमाणे महिला संघालादेखील सेकंड बेंच मिळेल, असा विश्‍वासही तिने व्यक्त केला. आयपीएल सुरु झाली तेव्हापासूनच महिला संघातील खेळाडूंसाठी देखील अशीच स्पर्धा व्हावी अशी मागणी अनेक खेळाडूंनी केली होती. मात्र, गेली 13 वर्षे ही मागणी प्रलंबीतच आहे. यंदा भारताच्या महिला संघाने विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत प्रथमच अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. उपविजेतेपदावर जरी समाधान मानावे लागले असले तरीही त्यातून भारतीय महिला संघाची ताकद वाढत असल्याचेही सिद्ध झाले होते. त्यामुळे महिलांसाठीही आयपीएल घेण्यात यावी ही मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे.

पुरुष खेळाडूंच्या स्पर्धेइतके स्टारडम महिलांच्या आयपीएलला मिळणार नाही हे मलाही मान्य आहे, पण या स्पर्धेतून महिला संघालादेखील गुणवान खेळाडू गवसतील. त्यामुळे दरवर्षी ही स्पर्धा घेतली गेली तर महिला संघाला सेकंड बेंच मिळेल, असाही विश्‍वास मानधनाने व्यक्त केला. काही वर्षांपूर्वी महिला खेळाडूंचे 3 संघ तयार करुन प्रदर्शनीय सामने खेळवले होते, त्याला चांगलाच प्रतिसादही मिळाला होता. त्यामुळे किमान 5 ते 6 संघांत जरी ही स्पर्धा खेळवली गेली तरीही भारताच्या महिला क्रिकेटला फायदाच होणार आहे, असेही मानधनाने सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.