फायनान्स कंपन्यांवर कारवाई करण्याची महिलांची मागणी

कराड – फायनान्स कंपन्यांनी अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्याबाबत पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. कराड तालुक्‍यातही फायनान्स कंपन्यांकडून खासगी सावकारी सुरू आहे, त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी. अन्यथा सामुदायिक आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी रेठरे बुद्रुक येथील 31 महिलांच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हा उपनिबंधक व जिल्हा पोलीस प्रमुख यांना देण्यात आले आहे.

निवेदनातील माहिती अशी, कराड तालुक्‍यात फायनान्सच्या माध्यमातून शेतकरी, महिला, शेतमजूर यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली जात आहे. रेठरे बुद्रुक येथील सुमारे 80 महिलांची फसवणूक व आर्थिक लूट फायनान्स कंपनीकडून सुरू आहे. कर्जाची रक्‍कम भरली असतानाही येणेबाकी दाखवली जात आहे. अशा फसव्या वसुली एजंटांची चौकशी करण्यात यावी.

तालुक्‍यातील फायनान्स कंपन्यांच्या गुंडांकडून कर्जदारांना धमकावणे, वसुलीसाठी तगादा लावणे असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे या गुंडांवरही कारवाई करण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर रेठरे बुद्रुक येथील मंगल हिवरे, शारदा जाधव, अनिता कापूरकर, कमल डोईफोडे, पद्या सपकाळ, अफसाना मुल्ला, पुष्पा पवार, शोभा सूर्यवंशी, सुरेखा मते, शालन यादव यांच्यासह 31 महिलांच्या सह्या आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.