भोर पंचायत समितीमधील प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी वृषाली साबणे यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत सर्वसामान्यांच्या भेडसावणाऱ्या प्रश्नांला सोडवले. महाविद्यालयीन जीवनात त्यांना याची जाणीव नव्हती. मात्र, त्यानंतर समाजभान जागृत झाल्यानंतर त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. मास्टर्स इन सोशल वेल्फेअर अर्थात एमएसडब्ल्यूचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांची संघर्षमय प्रवासगाथा सुरू झाली. पतीची तोलामोलाची साथ, जबाबदारीची जाणीव यातून दिसणारी त्यांची समाजासाठीची आत्मियता प्रेरकता ही थक्क करणारी आहे. प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी या पदावर काम करताना त्यांच्यातील सामाजिक प्रगल्भता वाढीस लागली. यातून त्यांनी भोर तालुक्यात अंगणवाडी सेविकांचे प्रश्न हाताळले. मुलांच्या शिक्षणाचा पाया भक्कम केला, हा आदर्शवत प्रवास खास महिला दिनानिमित्त…
वृषाली साबणे यांचे मूळ गाव आंबेगाव तालुक्यातील मंचर (घोडेगाव). त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करताना त्यांना समाजभान प्राप्त झाले. आपण एका सधन कुटुंबात आहोत. मात्र, आजही समाजातील अनेक घटक मूलभूत सुविधांसाठी झगडत आहे, याची त्यांना जाणीव झाली. त्यामुळे त्यांच्यात जबाबदारीचे भान आले.
वृषाली साबणे यांनी पुण्यात एमएसडब्ल्यूचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी समाजातील वंचित घटकांसाठी झोकून देऊन काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पुण्यातील एका स्वयंसेवी संस्थेत काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सल्ला समुपदेशक म्हणून काम केले. व्यक्तिमत्व विकासावर भर आणि अडीअडचणीवर समुपदेशन केल्याने त्यांच्यातील एक क्षितीजाला परिसस्पर्श लाभला होता. त्यामुळे त्या आणखी जोमाने सामाजिक उपक्रमात हिरारीने सहभाग घेऊ लागल्या.
वर्ष 2001 मध्ये बारामती पंचायत समितीमध्ये सुपरवायझर (पर्यवेक्षिका) म्हणून रूजू झाल्या. तो काळ आतासारखा माहिती-दळणवळणाचा आणि जलद संपर्काचा नव्हता. त्यावेळी बारामतीच्या जिरायती भागात त्यांना काम करण्याची संधी मिळाली. तेथील प्रश्न जाणून घेऊन त्याला भिडण्याची क्षमता त्यांच्यात विकसित झाली. अंगणवाडीमधील प्रश्न टीम वर्कच्या माध्यमातून सोडविल्याने सर्व अंगणवाडी सेविकांमध्ये उत्साह भरला. अंगणवाडीतील प्रलंबित प्रश्न, मुलांची शिक्षणातील गोडी वाढावी, यासाठी त्यांनी उपक्रम राबविला. बारामती तालुक्यात त्यांनी अंगणवाडीत सुशोभिकरण, इ-लर्निंग आदी कामे त्यांनी केली आहेत.
वर्ष 2004 ते 2014 मध्ये हवेली पंचायत समितीत त्यांची बदली झाली. उरूळी कांचन कार्यक्षेत्रात त्यांनी सक्षमीकरणाचे काम केले. जोडीला लोकसहभाग हा घटक त्यांनी सामावून घेतला. अंगणवाडी इमारतीमध्ये अत्यावश्यक सुविधा, रंगरंगोटी आदी कामे त्यांनी केली.
वृषाली साबणे यांनी सहा महिने प्रभारीपदाची धुरा सांभाळली. भोर तालुक्यात प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी’ म्हणून नियुक्ती झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आणखी तळागाळात जाऊन काम करण्याची संधी त्यांना मिळाली. भोर-वेल्हे तालुक्यात अनेक गावे विकासपासून आणि शासकीय योजनांपासून वंचित आहेत. तिथे काम करण्याचे आव्हान होते. अनेक गावांत अंगणवाडी सेविका उपजिविकेसाठी शेतीशी निगडीत होत्या. अर्धा किलोमीटर डोंगररांगा पार करीत त्यांच्यापर्यंत पोहचण्याचे दिव्य काम साबणे यांनी केले आहे. अविरत सेवाव्रतीचे काम त्यांनी केल्याने तालुक्यातील अंगणवाडी सेविकांना एक नवा आयाम मिळाला.
कातकरी समाजातीळ महिलांसाठी भरीव काम
प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी वृषाली साबणे यांचे पती डॉ. आनंद शंकरराव साबणे हे भोर उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या अनुभवाची शिदोरी त्यांच्यासाठी ऊर्जा वाढविणारी आहे. मावळ तालुक्यात त्यांचे पती तालुका आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी आरोग्य क्षेत्रात अनेक कातकरी आणि वंचित घटकांना उपचाराच्या प्रवाहात आणले आहे. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून उपक्रम राबविले आहेत. वृषाली यांनी भोर तालुक्यात कातकरी महिलांना मार्गदर्शन, आरोग्याच्या प्रश्नांतून बाहेर काढले आहे. बेटी बचाव, बेटी पढाव, मोहिमेअंतर्गत महिलांचे डोहाळे जेवण, त्यांच्या मुलींचे नामकरण, किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन केले. त्यांनी ही परिसर आपले कुटुंब मानून साबणे यांच्या मुलाचा वाढदिवस कातकरी समाजात साजरा केला. इतकी वैचारिक प्रगल्भता त्यांनी वाढविली आहे.
कुटुंबाची तोलामोलाची साथ
प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी साबणे यांच्या आतापर्यंतच्या वाटचालीत कुटुंबप्रमुख म्हणून पती डॉ. आनंद साबणे यांची साथ मिळाली. प्रत्येक प्रश्न तडीस नेण्यासाठी त्यावर विचारमंथन आणि संवाद आणि निरसन करीत मात केली. साबणे यांचे पती वैद्यकीय सेवेत कार्यरत आहेत. त्यांचा आरोग्य क्षेत्रातील आवाका आणि अनुभवावर त्यांनी समस्या सोडविल्या आहेत. उपचार आणि अन्य सुविधांकडे त्यांनी कटाक्षाने लक्ष दिले. कुटुंबाची तोलामोलाची साथ ही वृषाली साबणे यांचा उत्साह वाढविणारी आहे. दुर्गम, डोंगरी भागातील महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी वृषाली साबणे यांनी झोकून देऊन काम केल्याने भोरच्या भूमीत त्यांचे कार्य आदर्शवत ठरले आहे.
शब्दांकन
भुजंगराव दाभाडे
दै. प्रभात प्रतिनिधी, भोर तालुका