बारामतीसह जिल्ह्यात ऍड. प्रिया महाडीक यांनी आपल्या कायदेविषयक तसेच सामाजिक क्षेत्रात भरीव काम केले आहे. मोफत खटले चालविण्याबरोबर त्यांनी महिलांना समुपदेशन, ताणतणावावर मार्गदर्शन, महिला सबलीकरण, लैंगिक शोषण विरोधी कायदा आदींच्या माध्यमातून कर्तृत्वाची छटा उमटविली आहे. कायदेविषयक क्षेत्र व्यापून टाकल्यानंतर मनोरंजन विश्वातून प्रबोधनाचा वसा हाती घेतला आहे. महिला दिनानिमित्त लढवय्या ऍड. प्रिया महाडिक यांच्या वाटचालीवर टाकलेला प्रकाशझोत…
ऍड. प्रिया महाडीक यांचे शालेय शिक्षण बाल विकास मंदिर (खउडए बोर्ड) येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण विद्या प्रतिष्ठान आर्टस् सायन्स कॉमर्स कॉलेजमधून घेतले आहे. इंग्लिश विषयात बी. ए. ची पदवी संपादन केली. यानंतर वकिलीचे शिक्षण घेण्यासाठी त्यांनी विद्या प्रतिष्ठान वसंतराव पवार लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर वर्ष 2006 पासून ऍड. विजयराव मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वकिली व्यवसायास सुरूवात केली. दिवाणी व फौजदारी स्वरूपाची प्रॅक्टिस सुरू केली. फ्री लीगल एडच्या माध्यमातून मोफत केसेस चालविण्याचा सामाजिक उपक्रम त्यांनी हाती घेतला. कारागृहातील आरोपी महिलांना समुपदेशन करून त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली. विधी सेवा समितीअंतर्गत मोफत कायदेविषयक शिबिरांमध्ये सहभाग घेत, लोक न्यायालयामध्ये सहभाग व समुपदेशन केले.
वर्ष 2006 पासून भवानीनगर, काटेवाडी, कळंब, सोमेश्वर, बारामती, कटफळ, भिगवण, इंदापूर, पणदरे, ढाकाळे येथील महाविद्यालय व शाळांमधील मुला-मुलींना कायदेविषयक, सायबर कायदे, रॅगिंग कायदे, सॉफ्ट स्किल, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, डिप्रेशन, स्त्री-सबलीकरण, लैंगिक शोषण विरोधी कायदा, सुजाण पालकत्व, महिला सबलीकरण आदी विषयांवर व्याख्याने दिली. महिला लैंगिक शोषणविरोधी कायद्यांतर्गत विविध संस्थांवर 2007 पासून ऍड. महाडीक कार्यरत आहेत. स्वामी चिंचोली, डाळज येथे कायदेविषयक तसेच महिलांचे मानसिक आरोग्यविषयक व्याख्याने दिली आहेत. वर्ष 2018 पासून महिला व बालकल्याण विभागांतर्गत मोफत कायदा सल्ला केंद्रातून बारामती शहरातील महिलांना मोफत कायद्यांचे ज्ञान व सल्ला देत आहेत.
ऍड. महाडीक यांनी अनेक पुरस्कारांवर आपली मोहोर उमटविली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती व पंडिता रमाबाई संस्था यांच्यातर्फे विशेष सामाजिक पुरस्कार, बारामती वकील संघटनेतर्फे नाट्य क्षेत्रात विशेष कामगिरी केल्याबद्दल सत्कार, पंचायत समिती मार्फत महिला सबलीकरण कार्यासाठी विशेष पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. महिलांमध्ये प्रसुतीनंतर येणारे नैराश्य याविषयक विशेष अभ्यास व जनजागृती मोहीम वर्ष 2015 पासून सुरू आहे, शारदा कृषी वाहिनी अंतर्गत महिलांमध्ये जनजागृतीपर मुलाखत तसेच विविध ठिकाणी व्याख्यान देत आहेत.
मनोरंजन विश्वातून प्रबोधन,जनजागृतीचा ध्यास
नटराज नाट्य कला मंडळाचे सदस्य या माध्यमातून शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून “तरुणांमधील आत्महत्या’ या विषयावर जनजागृतीपर निर्मिती लेखन व दिग्दर्शन
वर्ष 2009 – राज्य शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाच्या राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत अष्टपैलू कलागुणाची झलक. सुप्रीम कोर्टाने दिलेला महत्त्वाचा निर्णय या विषयावर “भादंवि कलम 377′ या नाटकाचे लेखन, दिग्दर्शन, अभिनयाकरिता पुरस्कार
वर्ष 2003 – “सागरा प्राण तळमळला’ मधील माई सावरकर या भूमिकेकरिता अभिनयाचा पुरस्कार
वर्ष 2007 – “फक्त माणूस म्हण’ मधील भूमिकेसाठी अभिनयाचे रौप्यपदक,
वर्ष 2010 – “एक रात का मेहमान अंधेरा’ मधील भूमिकेसाठी अभिनयाचा पुरस्कार. नाटकातील संगीत दिग्दर्शन नटराज नाट्य कला मंडळाच्या माध्यमातून नाट्य व सामाजिक कामांमध्ये सक्रिय सहभाग आहे.
वर्ष 1997 पासून मॉरल रिआर्मामेंट, इनिशिटिव्हज ऑफ चेंज, पाचगणीच्या माध्यमातून युवकांना नैतिक मूल्य, जबाबदाऱ्या विषयावर मार्गदर्शन व समुपदेशन.
शब्दांकन
प्रमोद ठोंबरे,
बारामती प्रतिनिधी