महिला दिन विशेष : दोनवेळा एव्हरेस्ट सर करणारी प्रथम गिर्यारोहक महिला संतोष यादव

बहुचर्चित संतोष यादव यांचे नाव गिर्यारोहण क्षेत्रात अग्रेसर मानले जाते. याचे कारण म्हणजे विश्‍वातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर त्यांनी दोनवेळा सर केले. इतकेच नाही तर दुसऱ्यावेळी त्यांनी गिर्यारोहणासाठी चीनच्या बाजूने असलेल्या कांगशुंग या अतिशय कठीण व आवाहानात्मक मार्गांची निवड केली. नेपाळच्या वेळेनुसार सकाळी 7.10 ला त्यांच्या गटातील एकूण दहापैकी तीन जणांनी एव्हरेस्ट शिखरावर पोहोचून तिथे तिरंगा फडकावला. या तीन जणांमध्ये संतोष यादव या केवळ एकमेव महिला होत्या. इतकेच नव्हे तर संपूर्ण 10 जणांच्या या गटाचे त्या नेतृत्व करीत होत्या. अंदाजे 8,848 मीटर उंचावर जिथे तापमान सामान्य तापमानापेक्षा 40-50 डिग्रीने सेल्सिअसपेक्षाही कमी असते. अशा ठिकाणी तिरंगा फडकाविल्यावर संतोष यादव यांनी अत्यंत प्रसन्नचित्ताने आणि उत्साही आवाजात त्यांना भेट मिळालेल्या इरिडिअम सेटेलाईट फोनवरून सर्वप्रथम ही बातमी तत्कालीन पंतप्रधान श्री. अटलबिहारी वाजपेयी यांना दिली. प्रत्युत्तरादाखल वाजपेयी यांनी संतोष यादव यांचे व त्यांच्या गटाचे अभिनंदन करून “तुमच्या या कामगिरीचा देशाला अभिमान वाटेल’ असे म्हटले.

गिर्यारोहणात विक्रम स्थापित केल्यानंतर संतोष यादव यांनी सिव्हिल सर्व्हिस स्पर्धा परीक्षेत यश मिळवून त्या पोलीस अधिकारी झाल्या. सर्व क्षेत्रांत त्यांनी प्रसिद्धी व लोकप्रियता मिळविली. पुढे त्यांना खेळ जगतातील प्रतिष्ठित “अर्जुन पुरस्कार’ आणि “पद्मश्री’ या राष्ट्रीय सन्मानाने गौरविण्यात आले. त्या अत्यंत सरळ व मनमिळावू स्वभावाच्या आहेत. याचा अनुभव मला त्यांची एक मुलाखत घेताना आला. यानंतर मी आमच्या “सूर्या संस्थान’ या संस्थेत महिलांना आत्मरक्षणाचे प्रशिक्षण देण्यासाठी त्यांना आमंत्रित केले होते. तेव्हा त्या कुठल्याही प्रकारचे आढेवेढे न घेता आल्या व त्यांनी अत्यंत उत्तम प्रशिक्षण दिले. एक यशस्वी गिर्यारोहक व पोलीस अधिकारी झाल्यावर त्यांनी वयाच्या 35 व्या वर्षी विवाह केला व एक समर्पित पत्नी आणि आई म्हणूनही आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.

पोलीस सेवेत असतानाही त्यांना सुट्ट्यांच्या दरम्यान गिर्यारोहण करण्याची सूट देण्यात आली होती; परंतु विवाहानंतर त्यांनी स्वेच्छेने हा मोह सोडला व एक अधिकारी, पत्नी आणि आई म्हणून त्या आपले कर्तव्य करू लागल्या. त्यांच्याच म्हणण्यानुसार “”या सर्व जबाबदाऱ्या सांभाळणे हे आव्हान कुठल्याही एव्हरेस्ट विजयापेक्षा कमी आहे का?”

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.