#महिला_दिन_विशेष : समाजभान, कुटुंबवत्सल स्वरूपाताई संग्राम थोपटे

सोलापूर (माढा) चे शिंदे आणि भोरचे थोपटे या दोन घराण्यांतील राजकीय वारसा, आदर्शवत सासू, सासरे, पतीकडून मिळालेले सामाजिक भान, मिळालेली जबाबदारी लीलया पेलत, आमदार संग्राम थोपटे यांच्या पत्नी स्वरूपाताई थोपटे यांनी भोर, वेल्हे-मुळशी मतदारसंघात आपली सामाजिक प्रगल्भता सिद्ध केली आहे. महिलांशी आपुलकी, समाजाप्रती असलेली जबाबदारीची वीण घट्ट करत, त्यांनी खऱ्या अर्थाने प्रतिमा-संवर्धनाचे काम केले आहे. माहेर आणि सासरकडील कुटुंबात राजकीय वारशाच्या पावलावर पाऊल ठेवत ताईंनी गेल्या 15 वर्षांत प्रत्येक गावांतील समस्या, महिलांचे प्रश्‍न जाणून त्यांचे निराकारण करण्याचा प्रयत्न केला आहे. सुमारे दीड दशके स्वरूपाताई या समरस होऊन कार्य करीत आहेत. कुटुंबाची जबाबदारी, शिक्षण, आरोग्य क्षेत्रातील कार्य, महिलांचे सक्षमीकरण यावर भर देत त्यांनी मतदारसंघात कौतुकास्पद ठसा उमटविला आहे.

स्वरूपाताई थोपटे यांचे माहेर हे माढा तालुक्‍यातील टेंभुर्णी-निमगाव. सोलापूर जिल्ह्यातील शिंदे कुटुंबीयांना तीन पिढ्यांपासून समाजसेवा आणि राजकीय अर्थात लोकप्रतिनिधींचा वारसा आहे. ताई यांचे आजोबा विठ्ठलराव मारूतीराव शिंदे यांचे हे तत्कालीन आमदार होते. त्यानंतर ताईंचे वडिल बबनराव शिंदे यांची राजकीय कारर्किद ही गावपातळीपासून सरपंचपदापासून सुरू झाली. त्यानंतर त्यांनी सलग सहावेळा माढाचे प्रतिनिधीत्व केले. बालपणापासूनच राजकीय परीघ त्यांनी अनुभवला आहे. त्यामुळे स्वरूपाताई यांचे नेतृत्वगुण 15 वर्षांत उजळल्याची प्रचिती अधोरेखित होत आहे.

बबनराव शिंदे हे व्यक्‍तीमत्व राज्यात परिचित आहे. समाजाशी बांधिलकी आणि विकासकामांचा ध्यास, अशी ओळख शिंदे घराण्याची आहे. तीन पिढ्यांचा त्यांचा राजकीय प्रवास आहे. शिंदे यांची कन्या स्वरूपाताई यांचे शालेय शिक्षण टेंभुर्णी येथे झाले. त्यांनी प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण माढ्यात पूर्ण केले. पुण्यातील एसएनडीटी महाविद्यालयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले. कुटुंबातील सामाजिक बांधिलकी, संस्काररुपी शिदोरी त्यांना मिळाली. स्वरुपाताईंना त्यांच्या आईचे प्रोत्साहन आणि बाळकडू मिळाले. स्वरूपाताईंच्या आई सुनंदा बबनराव शिंदे यांना कृषी क्षेत्राची आवड आहे. त्यांना राज्य शासनाने जिजाऊ शेतीनिष्ठ पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. ताईंना दोन भाऊ. त्यांचाही राजकारणात लोकाभिमुख प्रवास आहे. दोन चुलते, चुलत भाऊ यांची राजकारणातील चाकोरी सोलापूरला परिचित आहे.

वर्ष 2001 मध्ये शिंदे कुटुंबीयातील स्वरूपाताई यांचा विवाह भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्याशी झाला. माजी मंत्री अनंतराव थोपटे आणि निर्मलाताई थोपटे यांच्या कुटुंबात सूनबाई म्हणून त्यांचा गृहप्रवेश झाला. प्रारंभी दोन वर्षे त्यांनी कुटुंबाची जबाबदारी पार पाडली. सासू निर्मलाताई यांच्या मार्गदर्शन आणि प्रोत्साहनातून त्यांनी भोरच्या भूमीत काम करण्यासाठी नवे अवकाश मिळाले. त्यांनी समाजातील आरोग्य, शैक्षणिक क्षेत्रातील प्रश्‍न आणि त्याच्या मुळापर्यंत जाण्याचे बाळकडू सासू, सासरे, पती यांच्याकडून मिळाले.

ताईंच्या सासू निर्मलाताई यांचे शिक्षण आणि शिक्षण, सामाजिक क्षेत्रातील काम हे तालुक्‍यातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचले आहे. मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबातील मुलगा-मुलगी शिकली पाहिजे, त्यातूनच कुटुंब आणि समाजाची प्रगती आहे, हेच तत्व त्यांनी अंगीकारले होते. निर्मलाताई राजगड ज्ञानपीठाच्या सचिव होत्या. त्यांनी शिक्षणातून कुटुंब, समाजाची प्रगती, हेच ब्रीदवाक्‍य जोपासले. राजगडच्या विस्तारात स्वरुपाताई यांच्या सासूंचे योगदान आहे. पहिलीपासून ते पदवी, पदव्युत्तर शिक्षणापर्यंतची सुविधा राजगडच्या माध्यमातून दिली जात आहे. त्यांची राजगड ज्ञानपीठाच्या विश्‍वस्तपदी नियुक्‍ती करण्यात आली.

स्वरूपाताई यांनी एकीकडे समाजवसा पेलताना कौटुंबिक जबाबदारी लिलया पार पाडत आहेत. मुलगा पृथ्वीराज थोपटे आणि कन्या तेजस्विनी यांना संस्काराचे बाळकडू मिळत आहेत. नणंद, राजगड ज्ञानपीठाच्या सचिव डॉ. भाग्यश्री पाटील, राजश्रीताई पिंगळे यांचा जिव्हाळा त्यांच्यासाठी वृद्धीगंत करणारा ठरत आहे. स्वरूपाताई यांनी अनंतराव थोपटे यांचा सामाजिक वारसा आत्मसात केला आहे.

वंचित घटक शिक्षणाच्या प्रवाहात….

राजगड ज्ञानपीठाच्या विश्‍वस्तपदी स्वरूपाताई थोपटे यांची निवड झाली. शिक्षणासाठी समाजाप्रती ओढ त्यांना लागली. सासू निर्मलाताई यांची शिकवण, सासरे अनंतराव थोपटे यांचे मार्गदर्शन, पती संग्राम थोपटे यांची तोलामोलाची साथ, या जोरावर त्यांनी शिक्षणाचा परीघ व्यापून टाकला. प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांशी आपुलकीने संवाद साधला. भोर-वेल्हे-मुळशी भौगोलिकदृष्ट्या सर्वांत मोठ्या मतदारसंघात निराधार, गरजू कुटुंबातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना प्रवेश शुल्कात सवलत, शैक्षणिक मदतीने नवीन पिढीला शिक्षणात नवीन दिशा मिळाली आहे.

महिला सक्षमीकरणाचा ध्यास

स्वरूपाताई थोपटे यांनी शिक्षण क्षेत्रात ठसा उमटवल्यानंतर महिला सक्षमीकरणासाठी पुढाकार घेतला. दुर्गम आणि डोंगरी भागातील महिलांना संघटीत करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. महिला मेळावे, मार्गदर्शनपर समारंभातून त्यांनी महिलांच्या अडीअडचणींची स्थिती समजावून घेतली. त्यावर उपाययोजना, प्रश्‍नांचे निराकारण करण्यासाठी ध्यास घेतला. सर्वसामान्य महिलांपर्यंत जाण्याचा त्यांचा प्रयत्न आणि संपर्क, संवादातून महिलांना स्फूर्ती मिळाली. त्यातून महिला बचत गटातील महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी परिपूर्ण काम केले.

भोर-वेल्हे-मुळशी मतदारसंघातील महिलांचे प्रश्‍न समोर आल्यानंतर ताईंनी आमदार संग्रामदादा थोपटे यांच्या माध्यमातून तडीस नेले आहेत. निराधार, विधवा, परितक्‍त्या महिलांना हक्‍काचा घास शासकीय माध्यमातून मिळाला पाहिजे, शासनाची मदत प्रत्येक गरजू कुटुंबाच्या दारी पोहोचली पाहिजे, याचा ध्यास घेत काम केले आहे. मतदारसंघात श्रावण बाळ योजना संजय गांधी निराधार योजना आदी शासकीय योजना खऱ्या अर्थाने तळागाळापर्यंत पोहोचल्या आहेत. दुर्गम आणि डोंगरी भागातील महिलांना आता स्वरूपाताई यांच्या माध्यमातून हक्‍काचे व्यासपीठ बनून त्यांचा एक आवाज बनल्या आहेत.

पर्यावरण आणि सांस्कृतिकतेचा मिलाफ  

स्वरूपाताई थोपटे यांनी ग्रामीण भागातील पाया भक्‍कम केला आहेच. शिवाय शहरी भागातील महिलांना एकत्रित केले आहे. हळदी-कुंकू समारंभ हा मतदारसंघासाठी लक्षवेधी ठरला आहे. यात महिलांशी संवाद साधण्यात आल्याने त्यांना एक व्यासपीठ मिळाले आहे. पाच वर्षांपासून भोर शहरात हा उपक्रम प्रभावीपणे राबविला जात आहे. “महिला मेळावा’ आयोजित करीत त्यांनी उदयोन्मुख महिलांना दिशा दिली आहे. भोरमधील मूलभूत सुविधा व अन्य प्रश्‍नांसंदर्भात नगरसेवक, नगरसेविकांशी चर्चा करून शहरवासियांना दिलासा देण्याचे काम केले आहे.

पर्यावरणाची कास धरीत त्यांनी भोर शहराला पर्यावरणदृष्टया सक्षम बनवण्याचा निर्धार केला आहे. भोर नगरपालिकेच्या वतीने दोन हजार वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. स्वरूपाताई यांनी “माझी वसुंधरा योजना’ भोर शहरात साकारण्याचा कानमंत्र लोकप्रतिनिधींना दिला आहे. त्याचबरोबर सांस्कृतिक आणि अध्यात्मिकतेची जोड दिली आहे. गणेशोत्सवानिमित्त “गौराई सजावट स्पर्धा’ आयोजित करून त्यांनी महिलांमधील उपजत कलागुणांना वाव दिला आहे. सर्वसमावेशक स्पर्धेतून विजेत्यांना बक्षिसे देत त्यांची ऊर्जा वाढविली आहे.

कृषी क्षेत्राशी बांधिलकी जोपासली

स्वरूपाताई यांना शेतीची आवड असल्याने सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, सांस्कृतिक क्षेत्रात समरस होऊन काम करतात. त्याचप्रमाणे शेतीचे प्रश्‍न आणि शेतकऱ्यांच्या समस्या त्या जाणून घेतात. त्यानंतर आमदार संग्रामदादांकडे शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसाठी पाठपुरावा करतात. गुंजवणीचा पाण्याचा प्रश्‍न, शेतीला भेडसावणाऱ्या प्रश्‍नांचे निराकारण करण्यासाठी त्यांचा आग्रह शेतकऱ्यांप्रती आत्मीयता दर्शविणारी आहे. मुळशी, वेल्हे तालुक्‍यातील पाणीप्रश्‍न, गुंजवणी योजनेप्रश्‍नी शेतकरी जेव्हा ताईंसमोर व्यथा मांडतात, त्याचवेळी ताईंचा संग्रामदादांकडे पाठपुरावा सुरू असतो. हा पाठपुरावा समस्येच्या मुळापर्यंत जाण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील समस्या निवारणाचा भाव त्यांना स्फूर्तीदायक ठरत आहे.

कुटुंबप्रमुखाप्रमाणे सामुदायिक विवाह सोहळे

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांनी मतदारसंघातील नागरिकांवर कुटुंबाप्रमाणे प्रेम केले. आज हा वारसा त्यांची दुसरी पिढी सक्षमपणे सांभाळत आहे. यात थोपटे कुटुंबातील सर्वजण दक्ष असतात. दुर्गम आणि डोंगरी भागातील विवाहसंस्था बळकट करण्यासाठी, तसेच कुटुंबाचा भार हलका करण्यासाठी सामुदायिक विवाह सोहळा सुरू करण्यात आला. यात वधू-वरांना संसारोपयोगी सर्व साहित्य आणि विवाहानंतर गृहप्रवेश करण्यापर्यंतचा खर्च करण्यात येतो. विवाहातील अनावश्‍यक खर्च टाळून या सोहळ्यात आतापर्यंत सुमारे दोन हजार जोडप्यांची विवाह सोहळे झाले आहेत. कुटुंबप्रमुख म्हणून हा सोहळा मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबासाठी अविस्मरणीय ठरला आहे. यात थोपटे कुटुंबीयांची आत्मीयता दिसून येते.

मतदारसंघातील सुख दु:खात सहभागी

थोपटे कुटुंबीय हे भोर-वेल्हे-मुळशी मतदारसंघात प्रत्येकांच्या सुख-दु:खात सहभागी होत असतात. त्यांच्या अडचणी सोडवून त्यांना मदतीचा हात दिला जातो. त्यामुळे आजही थोपटे कुटुंबीयांशी संपूर्ण मतदारसंघ स्नेहपूर्ण नाते भक्‍कम आहे. मतदारसंघातील कार्यकर्ते, सर्वसामान्यांचा विवाह सोहळा अथवा कार्यक्रम असो कुटुंबप्रमुखांप्रमाणे त्यांची हजेरी असते. त्यांची हीच उपस्थिती सर्वसामान्यांना सुखावणारी ठरत आहे. त्याचप्रमाणे एक आत्मीयता निर्माण करून त्यात जिव्हाळा निर्माण केला आहे. आज स्वरूपाताई या मतदारसंघातील हजारो कुटुंबाच्या सुख-दु:खात सहभागी होत मतदारसंघातील ताईची भूमिका निभावत आहेत.

शब्दांकन : भुजंगराव दाभाडे, दै. प्रभात, भोर तालुका प्रतिनिधी

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.