महिला दिन विशेष : समाजसेवेचा आधारवड ‘साधनाताई आमटे’

पूर्वाश्रमीच्या इंदू घुलेंचा विवाह बाबा आमटेंशी झाला आणि त्या दिवसापासून साधना नावाने त्यांचा प्रवास दीन-दलित, कुष्ठरोगी, अनाथ-अपंगाच्या सेवेकरिता सुरू झाला. “साधना’ हे फक्‍त नाव न राहता कर्म झाले. साधनेची ही खंड अविरत “साधना’ आनंदवनात फळ फुलाला आली. समाजसेवेचा हा आधारवड कॅन्सरच्या विळख्यात अडकून किडनीच्या आजाराचे निमित्त होऊन 9/7/2011 रोजी शनिवारी सायंकाळी अनंतात विलीन झाला फेब्रुवारी 2008 मध्ये बाबांचे देहावसान झाल्यानंतरही त्यांचे कार्य निष्ठेने पूर्ण करणारी अशी माऊली पुन्हा होणे नाही. हेच खरे! “नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ शोधू नये” असे म्हणतात जे सेवाव्रताच्या अत्युच्च शिखराकडे झेपावले नव्हे स्वतःच हिमनग झालेत त्यांच्या चरित्राचा शोध घेतला तर त्यांच्याकडे आयुष्याच्या कोणत्याही वळणावरून पाहिले तरी ते सर्वांकरिता आदर्श व्यक्‍तिमत्त्वच असतात. असेच एक आदर्श व्यक्‍तिमत्त्व म्हणजे साधनाताई आमटे.

वडिलांच्या निधनानंतर इंदूसाठी स्थळ शोधणे सुरू होते. त्याचवेळी लांब दाढी, जटा, भगवी कफनी, हातात काठी अशा साधू वेशातले मुरली आमटे त्यांच्या घरी आले. इंदू आणि मुरली दोघांना नकळत अंतर्मनाची साक्ष पटली. मोठ्या दोन बहिणींना जेथून पत्रिका जमत नाही म्हणून नकार आला होता तेथेच इंदूचे लग्न वय, व्यवसाय, परिस्थिती कशाचाही विचार न करता झाले. बाबा आमटेंसी 18 डिसेंबर, 1946 रोजी विवाहबद्ध होऊन इंदूची साधना आमटे झाली. अविरत सेवा, कष्ट, त्याग, संकटे, संघर्ष, आणि संयम या सप्तपदीवरून चालत आयुष्यभर “साधना’ करत राहिली.

गरिबीचे वाण असे स्वतःहून स्वीकारले म्हणजे निवासस्थान धर्मशाळा, रेल्वेस्थानक हेच झाले. साधनाताईंनी हे सर्व विनातक्रार, हसतमुखाने आपलेसे केले. म्हणून पुढे विनोबाजींनी या “कर्मण्येवाधिकारस्ते मां. फलेषु कदाचन” म्हणत पतीधर्म पाळणाऱ्या मनस्वी स्त्रीला खरी पतिव्रता म्हटले आणि हीच पतिव्रता ही त्यांची “यशोदा, अन्नपूर्णा” ही होती. मात्र, ही बिरुदे मिळण्यापर्यंतचा प्रवास अतिशय खडतर होता. आजचे “आनंदवन’ निर्माण करण्याकरिता साधनाताईंनी वनात राहून वनवास भोगला. मात्र, त्यांचा त्याग, कष्ट, सेवानिष्ठा आज खऱ्या अर्थाने फळाला आली.

एकदा असेच छिंदवाड्यास बाबांच्या बहिणीकडे जात असताना रेल्वेमध्ये “आशिक मस्त फकीर हु’ हे सुरेल गाणे म्हणणाऱ्या विनातिकीट प्रवास करणाऱ्या गोपाळ भटनागरला बाबा आणि साधनाताईंनी घरी आश्रयास आणले. ही प्रथा मग सुरूच झाली. दीन-दुबळे, गोरगरीब, अपंग यांचे दुःख हलके करायचे. त्यातच एकदा बाबांना रस्त्यात एक महारोगी पडलेला दिसला. जखमेवर किडे, अळ्या वळवळतात, समाज तिरस्कार करतो. अशा पराकोटीच्या अवहेलनेचे ते विदारक चित्र होते. ते पाहून “समाजाने विवंचनेच्या उंबरठ्यापलीकडे गेलेल्यांचे विश्‍व निर्माण करून त्यांना चांगले आयुष्य व आयुष्यातला गेलेला सन्मान पुन्हा मिळवून देण्याचा निर्धार” बाबांनी केला तो फक्‍त भक्‍कम पाठिंबा देणाऱ्या साधनाताईंच्या सहकार्याच्या विश्‍वासावरच. तो विश्‍वास साधनातांनी सार्थ केला. आज त्याचे सार्थक म्हणून आनंदवन, सोमनाथ, भामरागड, हेमलकसा, अशोकवन, कासराबाद हे प्रकल्पच सर्वांना साक्ष देतात.

वकिली सोडून वंचितांची, महारोग्यांची सेवा करण्याकरिता 1949 ला “महारोगी सेवा समितीची’ स्थापना करून आयुष्यातल्या नव्या वळणाकडे आमटे दाम्पत्य वळले आणि साधनाताईंना येथेच क्षयाने गाठले. त्या मानसिक ताणतणावाच्या दडपणाखालीच अधिक राहायच्या. कारण स्वतःचे आजारपण म्हणजे आपल्यापेक्षा मुलांची अबाळ हा अनुभव त्यांना मागेच आला होता. याआधी त्यांना टॉयफाईड झालेला होता. विकास (मोठा मुलगा)ला इंदिराताई महाबळ मातृसेवासंघात ठेवले. मात्र, तेथील नर्स त्याला खोलीत बंद करून ठेवायची. त्याचे कोणी कपडेही बदलत नसे. लोकांच्या सेवेला अहोरात्र झटून संपूर्ण जीवन समर्पित करणाऱ्यांना आलेला हा अनुभव म्हणजे विसंगतीचे उत्तम उदाहरणच आहे. शासनाकडून महारोगी सेवा समिती प्रकल्पाला पन्नास एकर जमीन मिळाली.

आणि त्यातल्या ट्रस्टींनी 50 रु. प्रत्येकी योगदान देऊन पहिली झोपडी निर्माण केली. भूदान चळवळीचे प्रणेते श्री. विनोबाजींनी सहा कुष्ठरोग्यांना त्या झोपडीत नेले आणि “या ठिकाणी रामायण घडेल” हा आशीर्वाद दिला. आज तो आशीर्वाद बाबांचे ध्येय आणि साधनाताईंचा त्याग यामुळे “आमटेयान” म्हणून बहराला आला. विनोबाजींनी बाबांना दिलेले 100 रु. हे त्यावेळी हातात असलेले रोख भांडवल, सहा कुष्ठरोगी आणि एक लंगडी गाय एवढ्या भांडवलासोबत समाजसेवेचा सुरू झालेला हा प्रवास आहे. यात बाबांचे चरित्र लिहायचे तर साधनाताईंना वगळता येत नाही आणि साधनाताईंबद्दल काही लिहायचे तर बाबांचा उल्लेख टाळणे अशक्‍य असे एकरूप झालेले सहजीवन सोबतच समाजाचा “आदर्श’ म्हणून एकत्रितच समोर येते.

एकदा शिवाजीराव पटवर्धन आनंदवनात आलेले असताना त्यांनी साधनाताईंना एका लहानग्या मुलीस मातेच्या मायेने न्हाऊ घालत असलेले पाहिले. ते साधनाताईंना म्हणाले, “कोण कोणाची मुलगी अन्‌ तू मातेच्या वात्सल्याने मायेची पाखर धरतेस.” तेव्हा साधनाताईंनी सांगितले, “ही देवाघरची ठेव, जीवापाड जपायची, सांभाळायची. नाहीतर त्याच्या विश्‍वासाला तडा जाईल. ज्याने चोच दिली तो चाराही निर्माण करतोच.” अशी वृत्ती स्वभावात असलेल्या मातेने रेणुका, मायासारख्या मानसकन्यांना घडवले. 6 महिन्यांच्या मायाला रस्त्याच्या कडेला खड्ड्यात पडलेली असताना उचलून आणले. त्याच दिवशी आनंदवनात वीज आली म्हणून तिचे नाव बिजली ठेवले होते.

माणसाच्या शरीराला, मनाला सहनशीलतेची जन्मजात देणगी असतेच; पण सुखासीन जीवनात ती लुप्त होते. साधनाताईंच्या आयुष्यात समाधानी क्षण असंख्य आले मात्र त्यांनी निग्रहाने स्वतःहून सुखासीनतेला दूर लोटले. म्हणूनच आयुष्यभर समाजसेवेचे, त्यागाचे व्रत सफल झाले. जगाला सोडून चैतन्याची कास धरणारा जीवनासाठी असला की, देवभोळ्या स्त्रीला जवळचे देव बासणात बांधून ठेवावे लागतात. तीच स्थिती साधनाताईंची होती; परंतु पार्वतीबाई पटवर्धनांच्या पाठिंब्यामुळे बासणातला देव्हारा बाहेर आला. बाबांना मूर्तीपूजा मान्य नव्हती; पण परमेश्‍वराचे अस्तित्व त्यांना मान्य होते. त्यामुळे साधनाताईंच्या श्रद्धेचाही ते आदर करायचे

विंचू, इंगळ्या, साप, नाग, माकडे, वाघ, लांडगे, कोल्हे, कुत्रे हेच कुटुंबातले सदस्य असल्यासारखे सभोवार विखुरलेले. विंचू, इंगळ्यांचे डंख किती झाले याची गणना नाही. मात्र, एका सर्पदंशामुळे बाबांची प्राणज्योतच पणाला लागली तेव्हा मिरच्या, कडुनिंब सेवन, रात्रभर भजन गजर आणि देवाचा धावा सुरू असतानाच मांगलीकर तेथे आले. त्यांनी एक औषधी मुळी बाबांना दिली आणि सर्वकाही मंगल झाले. देवभोळ्या साधनाताईंना मांगलीकर हे देवरूप वाटले नाही तरच नवल. एकदा तर साधनाताईंनी एकाच वेळी कुडाच्या भिंतीतून 150 इंगळ्या मारल्या. यावरून त्या कोणत्या ठिकाणी आणि कशा राहात असाव्या याची कल्पना येते. “हात उगारण्यासाठी नसून उभारण्यासाठी असतात” हे प्रत्यक्ष कृतीतून त्यांनी समाजाला दाखवले. त्यांनी फक्त अनेक पावसाळेच पाहिले नाही तर समाजातल्या सर्वच स्तरावर आणि क्षेत्रात हे काम स्पृहणीय ठरले.

देशपरदेशातून निधी, देणग्या, पुरस्कार यांचा वर्षाव सुरू झाला. वेदनेच्या मुळाशी असणाऱ्या माणुसकीच्या नात्याचा हा प्रवाह विकास आणि प्रकाश या दोन्ही मुलातही तसाच खळखळता राहिला म्हणूनच साधनाताई म्हणतात. “विकासचा प्रकल्प पाहिला की डोळे दीपतात, प्रकाशचा प्रकल्प पाहिला की डोळे उघडतात.” आज आमटे घराणे हे समाजव्रताची समर्थ धुरा पेलणारे आहे. बाबा आणि साधनाताईंनी शून्यातून निर्माण केलेले हे विश्‍व पुढच्या पिढीकडे त्याच आत्मीयतेने येते आणि त्याच माया, ममता, त्याग, कष्ट, सेवेचा तेथे प्रत्यय येतो.

Leave A Reply

Your email address will not be published.