भोर तालुक्यातील टिटेघर येथील ध्रुव प्रतिष्ठानच्या विश्वस्त व ध्रुव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजीव केळकर यांनी दुर्गम आणि डोंगरी तालुक्यात सामाजिक कार्याचा डोंगर उभा केला आहे. या अथक साधनेत त्यांच्या पत्नी मनीषा केळकर यांनी लाखमोलाची साथ दिली आहे. पतीच्या खांद्याला खांदा लावून त्याही अनाथ, गरजू, कातकरी समाजाची माय बनली आहे. कुटुंबातील मुलाप्रमाणे त्यांची माया विशाल समुद्राप्रमाणे आहे. पतीच्या सहकार्याने सामाजिक यज्ञकुंडातील ज्योत मनीषा केळकर यांनी तेवती ठेवली आहे. आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आदी माध्यमातून “ध्रुव प्रतिष्ठान’च्या खंबीर पाठराखीण म्हणून उभ्या आहेत. महिलादिनानिमित्त त्यांच्या कार्याला दिलेला उजाळा…
भोर तालुक्यातील टिटेघर येथील ध्रुव प्रतिष्ठानच्या विश्वस्त व संस्थापक अध्यक्ष केळकर यांच्या सौभाग्यवती मनीषा केळकर यांचे भोर हे माहेरघर आहे. त्यांच्या वडीलांचे स्वामी समर्थ भक्ती ट्रस्ट आहे. भोर ते अक्कलकोट पायी दिंडी दरवर्षी असते. त्यात मनीषाताईंचा नेहमी सहभाग असतो. मनीषा केळकर यांच्या माहेरातील अध्यात्मिक आणि सामाजिक वारसा त्यांच्याकडे जन्मजातच आला आहे. वडिलांप्रमाणेच अन्नछत्र, गरिबांना मदत, दिंडीच्या माध्यमातून कार्यक्रम आदी समाजकार्याचा वारसा त्या पतींबरोबर पुढे चालवत आहेत.
मनीषाताईंचे शिक्षण बीएपर्यंत झाले. सोळा वर्षांपूर्वी वडिलांप्रमाणेच समाजकार्याची आवड असणाऱ्या राजीव केळकर यांच्याशी विवाह झाला. विवाह झाल्यापासून त्या आपल्या पतीच्या समाजकार्यात अविरतपणे खंबीरपणे साथ देत आहेत. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. मुलांचे पालनपोषण आणि कौटुंबिक जबाबदारी पार पाडत, आपण समाजाशी देणं लागतो, ही जाणीव ठेवून केळकर दाम्पत्यांनी झोकून देऊन काम सुरू केले.
सध्या त्या टिटेघर येथे भोर येथील बाजारभाव असलेल्या किमतीतच किराणा दुकान चालवत आहेत. सुईपासून सर्व वस्तू दुकानात भोर बाजारपेठेतील भावात मिळतात, पीठ गिरणी, गावात 16 बचत गट निर्माण करण्यासाठी मोठी मदत, महिला नवरात्र उत्सवामधून गावातील महिलांच्या बरोबरीने कार्य करीत आहेत. विविध समाजपयोगी कामे, “ध्रुव’च्या माध्यमातून महिलांना गोधडी, शिवण, फॅशन डिझाईन, कागदी पिशव्या, पार्लर प्रशिक्षण देऊन अनेक मुली व महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करत आहेत.
पोटच्या मुलांप्रमाणे इतर गरीब कुटुंबातील मुलांचा सांभाळ करीत त्यांना सुसंस्कृत करीत संस्कारक्षम पिढी घडविण्याचे त्या प्रयत्न करीत आहेत. आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या गरिबांच्या मुला-मुलींना खऱ्या अर्थाने एका मायेची ऊब त्यांनी दिली आहे. हल्लीच्या काळात दुसऱ्यांच्या मुलांचे संगोपन करणाऱ्या मनीषाताईंसारख्या महिला क्वचित पाहायला मिळतात. सर्व मुलांच्या काकू असलेल्या मनीषाताई संस्थेत असणाऱ्या मुलांचा बालहट्ट पुरवण्यात कधीच कमी पडत नाहीत. घरातील सर्व स्वयंपाक वगैरे कामे करून, मुलांचे संगोपन, दिवाळीत मुलांकडून आकाश कंदील कार्यशाळा आयोजित करून गरीब कुटुंब व मुलांना मोफत दिवाळी फराळ वाटप, शिवण प्रशिक्षणासह विधायक कामेही मोठ्या हिरारीने पार पडतात.
पुण्यातील दानशूर व्यक्तीबरोबरच अमेरिकेत स्थायिक असलेल्या आरती अनावकर या नेहमी त्यांना मदत करतात. पुण्या-मुंबईहून सुट्टीला फिरायला आलेले काहीजण मनीषा केळकरांची भेट घ्यायलाही विसरत नाहीत. हीच त्यांच्या माणुसकी आणि सेवाभावातील जनसंचयाची पोचपावती आहे. मनीषा केळकर यांच्या कार्यात घन:श्याम केळकर, डॉ. योगेंद्र आगटे, प्रा. विनय कुलकर्णी, प्रविण ढोले-पाटील, रामचंद्र कितूर, किशोर केळकर आदींचा नेहमीच पाठिंबा मिळत असतो.
भविष्यात ग्रामीण भागातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी विविध प्रकारचे रोजगार निर्माण करणार आहेत. गुणवत्ताधारक गरीब, गरजू विद्यार्थांनीना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी त्या सक्रिय आहेत. समाजसेवेचा वारसा घेतलेले पती राजीव केळकर यांच्या खांद्याला खांदा लावून नेहमीच मदत करणाऱ्या पडद्यामागच्या नारी शक्तीला म्हणजेच मनीषाताईंना जागतिक महिला दिनानिमित्त मानाचा सलाम.
विविध कार्याने लोकप्रिय…
करोना महामारीत लॉकडाऊनमध्ये “ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर त्यांनी चार पाच गावांना किराणा वाटप केला. करोनाच्या काळात पती राजीव केळकर यांना मदत करण्याकरिता त्या ठाम उभ्या होत्या. वाचकांसाठी मोफत असणाऱ्या साडेसात हजार पुस्तकांचे स्मृतिग्रंध ग्रंथालय चालवतात. संस्थेतील काही मुलींना शिक्षण देऊन लहानाचे मोठे केले. त्यांचे कन्यादान केले आहे. म्हसर येथील आरती आनंदा शिंदे हिचे संस्थेच्या वतीने शैक्षणिक पालकत्व घेतले आहे. त्या मुलीने खो- खो, ऍथलेटिक्समधून जिल्हा व राज्यस्तरीय यश संपादन केले आहे. गरजू, अनाथांची माय म्हणून त्यांची सेवाव्रती वृत्ती थक्क करणारी आहे.
– शब्दांकन
विलास मादगुडे