महिला दिन विशेष : स्त्री-पुरुष समानता हे वैश्विक सत्य

प्रभात ऑनलाइन – स्त्री-पुरुषांची समानता हे वैश्विक, अध्यात्मिक सत्य आहे. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार मिळावेत, ही न्यायसंगत गोष्ट आहे. हे असे एक तत्त्व आहे की, जे पावित्र्य आणि शुद्धतेच्या उच्चतम आदर्शांना अनुरूप आहे, ज्याचे अवलंबन पारिवारिक जीवन सशक्त करते. ते कोणत्याही राष्ट्राच्या पुनर्निर्मिती व प्रगतीसाठी अत्यावश्यक आहे.

न्यायप्रिय किंवा अन्यायी असणे, हिंसक किंवा दयाळूपणाने वागणे, बेईमान किंवा विश्वासू असणे, या वृत्ती सहसा घरीच विकसित होतात. या सवयी नंतर सामाजिक संवादातील प्रत्येक घटकाचा भाग बनतात. जर बंधूंना त्यांच्या भगिनींवर अधिराज्य गाजविण्याची परवानगी दिली, तर ती त्यांची सवय बनते, जी घरातून कामाच्या ठिकाणी आणि शेवटी आंतरराष्ट्रीय क्षेत्राचा भाग बनते.

याउलट जेव्हा मुलींना निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत समाविष्ट केले जाते आणि मुलांना घरगुती कामे शिकण्यास प्रोत्साहित केले जाते, तेव्हा मुलामुलींचे व्यक्तिमत्व सारखेच विकसित होते. शिक्षण हा सर्व समस्यांवरील तोडगा आहे, जो माणुसकीच्या गरजांना सुसंगत असलेल्या अनुरूप नात्यांचा नमुना समाजापुढे प्रस्थापित करेल.

मानवाच्या बौद्धिक आणि अध्यात्मिक या दोन्ही प्रकारच्या सामर्थ्याकडे लक्ष देणार्‍या शैक्षणिक प्रकियेत आपण गुंतवणूक केली पाहिजे. समाजाच्या आदर्शांनी मानवतेचे ऐक्य आणि स्त्री-पुरूष समानतेचा प्रसार केला पाहिजे.

मानवी अस्तित्वाची आणि विकासाची समज धर्म प्रदान करतो, जो खडतर मार्गापासून दूर क्षितिजाकडे बघण्याची दृष्टी देतो. जोपर्यंत मूलभूत सिद्धांतांची चेतना असेल, तोपर्यंत वैयक्तिक व सामूहिक जीवनातील नवीन व फायदेशीर पद्धती निर्माण करण्यासाठी धर्म ही सर्वात शक्तिशाली शक्ती ठरली आहे.

बहाई लिखाणामध्ये सांगितले आहे की, मानवी जगताचे दोन पंख आहेत – एक स्त्रीचे तर दुसरे पुरुषाचे. जोवर दोन्ही पंख समान पद्धतीने विकसित होणार नाहीत, तोपर्यंत पक्षी उडू शकणार नाही. एक पंख क्षीण असेल तर उडणे असंभव आहे. स्त्रियांचे जग गुण आणि परिपूर्णता प्राप्त करण्यात पुरुषांच्या जगाची बरोबरी करणार नाही, तोवर वांछित यश आणि समृद्धी मिळविता येणार नाही.

खरी समानता सुखासुखी मिळत नसते. त्यासाठी जे बदल आवश्यक आहेत, ते पुरुष आणि स्त्रिया या दोहोंसाठी कठीण आहेत. या सिद्धांताच्या व्यावहारिक बाजूची आपली समज वाढविण्याचा प्रयत्न करत राहावे. आपल्या कौटुंबिक आणि सामुदायिक जीवनात त्याचा सातत्याने पाठपुरावा करण्याचे प्रयत्न आपण करायला हवेत.

– सुनिती झा
प्रशासक, न्यू इरा हायस्कूल (पाचगणी)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.