महिला दिन विशेष : पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता

“सामाजिक वास्तवाकडे आजही निखळ दृष्टीने नाहीतर पूर्वग्रहदूषित नजरेनेच पाहिले जाते. असे असूनदेखील आजचा ध्येयवाद हा परिवर्तनाची अपेक्षा करणारा आहे. भारतीय स्त्री आपली परम सहनशीलता आणि सहानुभूतीच्या बळावर सामाजिक क्रांतीचे नेतृत्व बनू शकते. तेव्हा स्त्रियांमधील नव्या नेतृत्वाला, त्यांच्या भविष्याला एका आशादायी स्वरूपात प्रतिगामी शक्तीशी अर्थपूर्ण चर्चा करून बदल घडवून आणले पाहिजेत.” हे विचार आहेत श्रीमती सुचेता कृपलानी यांचे.

ज्यांच्यामध्ये सामाजिक आणि राजकीय या दोन्ही क्षेत्रात नेतृत्व करण्याचे गुण होते. उत्तर प्रदेशात या आधीच श्रीमती विजयालक्ष्मी पंडित यांना कॉंग्रेस मंत्रिमंडळात मंत्री आणि श्रीमती सरोजिनी नायडू यांना प्रथम राज्यपाल केले होते. त्याच राज्याने सुचेता कृपलानी यांना मुख्यमंत्री बनविले. त्याप्रमाणेच प्रथम महिला मुख्यमंत्री बनण्याचाही मान त्यांनी मिळवला. भारत देशाच्या विकासाची आस धरणाऱ्या त्या एक महत्त्वाकांक्षी महिला होत्या. सामाजिक आणि रचनात्मक क्षेत्रात सकारात्मक काम करत त्या हळूहळू पाऊल पुढे टाकत गेल्या.

महिला, शरणागत, श्रमजीवी, सेवा समित्या, कॉंग्रेसचे संघटन, परदेशातून भारताचे प्रतिनिधित्व, रचनात्मक कार्य आणि राजकीय डावपेच या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांना रुची होती. त्यानंतर त्यांनी परत कॉंग्रेस पक्षात प्रवेश करून 1962 व 1967 च्या निवडणुका कॉंग्रेसच्या तिकिटावर लढवून त्या विजयी झाल्या.

आचार्य जे. बी. कृपलानीसारख्या असहिष्णू नेत्याशी विवाह झाल्यामुळे आणि आपसातील वैयक्‍तिक मतभेदांमुळे अनेक अधिकारी अशा भ्रमात होते की, श्रीमती कृपलानी यांचे वैवाहिक जीवन सुखी नसेल; परंतु, तो केवळ त्यांचा भ्रमच होता. श्री. व श्रीमती कृपलानी दोघेही परस्परांच्या सुखसुविधांकडे, व्यक्‍तिमत्त्व विकासाकडे पूर्ण लक्ष देत होते. त्यांचे वैयक्‍तिक व वैवाहिक जीवन अत्यंत आनंदी व समाधानी होते. त्यामुळेच त्यांनी अनेक क्षेत्रांत आपला ठसा उमटविला. सुचेता कृपलानी स्वतःच एकदा म्हणाल्या होत्या, “माझे राजकारणातील स्थान माझ्या पतीमुळेच आहे, नाहीतर माझी वैयक्‍तिक आवड संगीत आणि समाजकार्यातच होती.

”मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर त्या एकदा मला म्हणाल्या होत्या की, “राजकारणात मला रुची नाही हे खरे आहे, तरीपण जे काय करायचे ते पूर्णतः मनापासून आणि दृढतेने पूर्ण करण्याकडे माझा कल राहिला आहे. त्यामुळे मी आता माझ्या आवडीच्या सामाजिक कार्य करण्याकडेच जास्त लक्ष देणार आहे.” एक तत्त्वनिष्ठ कार्यकर्त्या म्हणून त्या ओळखल्या जायच्या. त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांच्याकडे विविध तक्रारी घेऊन येणाऱ्यांमध्ये महिलांची टक्‍केवारी 60 टक्के होती.

बहुतेकवेळा महिला आपल्या वैयक्‍तिक समस्या घेऊन येत असत. अनेकवेळा श्रीमती कृपलानी त्यांची समजूत घालून तर काही वेळा आपल्या अधिकाराचा वापर करून त्यांच्या समस्या सोडवून त्यांची मदत करीत असत. एकदा तर एका महिलेने अशीही तक्रार केली की, आपल्या पतीने मुद्दाम आपली प्रेयसी राहात असलेल्या गावी आपली बदली करवून घेतली. तेव्हा कृपलानींनी त्या महिलेच्या पतीची बदली रद्द केली. अशाच प्रकारे अजून एका महिलेने आपला पती स्वतःच्या पत्रमैत्रिणीला भेटण्यास जात आहे अशी तक्रार केल्यानंतर श्रीमती कृपलानींनी त्याचा पासपोर्ट अवैध ठरविला.

श्रीमती कृपलानी मुख्यमंत्री बनण्यापूर्वी एक निष्ठावान कार्यकर्त्या म्हणून प्रसिद्ध असल्यामुळेच त्या मुख्यमंत्री झाल्यानंतरही महिला त्यांच्याकडे अशा अगदी वैयक्‍तिक स्वरूपाच्या तक्रारी घेऊन येत होत्या. डिसेंबर 1974 ला 68 वय वर्षे असलेल्या श्रीमती कृपलानी यांचे निधन झाले. आपल्या अंतिम काळात त्यांनी कॉंग्रेस पार्टीवर निराश असल्याचे कारण देत जनता पार्टीत प्रवेश केला. तेव्हा मात्र त्यांना राजकारणात काडीमात्रही रस उरला नव्हता. मुख्यमंत्रिपदातून मुक्‍त झाल्यानंतर त्या सामाजिक कार्यातच अधिक रमल्या. राजधानीतील “लोककल्याण समिती’ ही त्यांच्याच लोकोपयोगी कार्याचे द्योतक आहे

Leave A Reply

Your email address will not be published.