#महिला_दिन_विशेष : आरोग्यसेवेचा आधारवड डॉ. विद्या साठे

विद्येच्या माहेरघरातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. विद्या साठे एम.डी. (Obst and Gyn) यांनी जन्मभूमीत आरोग्यसेवेचा वसा घेत आपली रुग्णसेवा सुरू केली आहे. जनरल सर्जन डॉ. रवींद्र साठे आणि डॉ. विद्या साठे यांनी दौंड शहरात सुदृढ आरोग्याची बांधिलकी जोपासली आहे. डॉ. साठे दाम्पत्यांनी आपल्या जन्मभूमीला कर्मभूमी बनविण्याचा संकल्प करीत दौंडमध्ये वैद्यकीय सेवेला सुरूवात केली. त्यानंतर रुग्णाप्रती आस्था, आपुलकी, योग्य उपचारपद्धती, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत डॉ. विद्या साठे यांनी दौंड, बारामती शहरासह जिल्ह्यात आरोग्य क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. जागतिक महिला दिनानिमित्त डॉ. विद्या साठे यांच्याशी साधलेला संवाद…

दौंड येथील साठे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी व टेस्टट्यूब बेबी सेंटरची सत्तरीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. दौंड शहराला एक सर्जन, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्‍टरची गरज लक्षात घेऊन डॉ. रवींद्र साठे व डॉ. विद्या साठे यांनी आपल्या उच्चशिक्षणानंतर दौंड येथेच आपला वैद्यकीय व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. जानेवारी 1953 रोजी डॉ. मुकुंद विनायक साठे यांनी आपल्या वैद्यकीय शिक्षणानंतर आपला वैद्यकीय व्यवसाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (जुना टिळक चौक) दौंड येथे विष्णू सदनच्या राहत्या इमारतीमध्ये सुरू केला. त्यांनी दौंडच्या पंचक्रोशीत लहान मुलांचे डॉक्‍टर म्हणून मोठा नावलौकिक कमावला होता.

डॉ. विद्या साठे या पुण्याच्याच सुशिक्षित व सुसंस्कृत गोगटे घराण्यातील आहेत. आजोबा शिक्षक व वडील प्राध्यापक होते. पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघरी जन्माला आलेल्या कन्येचे नाव विद्या ठेवले गेले. त्यांनी ते नाव सार्थ ठरवीत एमईएस हायस्कूल व आबासाहेब गरवारे कॉलेज व बी. जे. मेडिकल कॉलेज येथून आपले शिक्षण पूर्ण केले. डॉ. विद्या साठे व डॉ. रवींद्र साठे हे 1982 रोजी विवाहबंधनात अडकले. या बंधनाअंती त्या दोघांनीही असा निर्णय घेतला की, आपल्या शिक्षणाचा फायदा हा आपल्या गावच्या लोकांना करून द्यायचा. म्हणून दोघांनीही पुणे शहराचा मोह सोडून दौंडला स्थायिक होणे पसंत केले. आपला वडिलोपार्जित वैद्यकीय सेवेचा व्यवसाय पुढे सुरू ठेवला. तो आता लवकरच सत्तरीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. यामागे निरपेक्ष आणि दर्जेदार आणि आधुनिक तंत्रज्ञानातील उपचारपद्धती, धन्वंतरीतील तपश्‍चर्या आहे. त्यामुळे आज साठे हॉस्पिटलचे नाव जिल्ह्यासह राज्यात परिचित आहे. मार्च 2019मध्ये साठे हॉस्पिटलला NABH नामांकन मिळाले आहे.

वंध्यत्व निवारणाचेही कार्य मोठेच
एकीकडे कडे डॉ. विद्या साठे या त्यांच्या वंध्यत्व निवारणाच्या कामात व्यस्त होत गेल्या. वंध्यत्व निवारणाच्या कामात डॉ. रवींद्र साठे यांचे मोलाचे सहकार्य त्यांना लाभले. खेड्यापाड्यातील गोरगरीब स्त्रिया वंध्यत्वामुळे शारीरिक व मानसिक छळाच्या बळी ठरत असताना, त्यांचे वंध्यत्व दूर करून त्यांना मातृत्व प्रदान करण्याचे मोलाचे व रुग्णसेवेचे काम डॉ. विद्या साठे करीत होत्या. बघता बघता त्यांच्या कामाचा व्याप झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रासह परराज्यातूनही जोडपी उपचारासाठी दौंडमधील साठे हॉस्पिटलमध्ये येऊ लागली.

डॉ. रवींद्र साठे यांनी आपले 8 वी पर्यंतचे शालेय शिक्षण दौंड येथील शेठ ज्योतीप्रसाद विद्यालय येथून पूर्ण करून पुढे मॉडर्न हायस्कूल पुणे व फर्ग्युसन कॉलेज, बी. जे. मेडिकल कॉलेज येथून पूर्ण केले. जनरल सर्जरी व डिप्लोमा इन ऍनेस्थेशियामध्ये गोल्ड मेडल मिळविले आहे. दोघांनीही आपल्या 35 वर्षांच्या वैद्यकीय सेवेच्या अनुभवात नेहमीच बदल केले आहेत. ते नेहमीच काहीतरी नवे तंत्र वापरतात. नव्या मशिनरी आणतात. डॉ. विद्या साठे यांनी 1992 रोजी केईएम हॉस्पिटलमधून सोनोलॉजिस्टचे प्रशिक्षण घेतले. तेव्हापासून आजपर्यंत अद्ययावत सोनोग्राफी मशीन त्यांनी घेतल्या आहेत. चांगल्यात चांगले निदान आपल्याला करता यावेत यासाठी त्या नेहमीच प्रयत्नशील असतात. वयाची 62 वर्षे पूर्ण करतानाही त्यांचा दोघांचा कामाचा उत्साह मात्र अजूनही 26 वर्षांच्या मुलांसारखा असतो. महिलांसाठी काम करणाऱ्या या महिलेला महिलादिनानिमित्त त्यांच्या निरपेक्ष आरोग्यसेवेला शुभेच्छा.

लॅप्रोस्कोपी व टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा उगम
दौंडसारख्या तालुक्‍याच्या गावात लॅप्रोस्कोपीने ऑपरेशन करणे व कृत्रिम गर्भधारणा केंद्र सुरू करणे हा मोठा धाडसी निर्णय होता. दौंड परिसरातील लोकांना या तंत्रज्ञानाची ओळखही नव्हती. या दोन्हीही गोष्टीत समाज अजून जागृत झालेला नव्हता. दोघांनीही आपआपल्या क्षेत्रात चाकोरीबाहेर जाऊन वेगवेगळे प्रयोग करून, नवनवीन उपकरणे उपलब्ध करीत अद्ययावत सोयी-सुविधा पुरविण्याची सामाजिक बांधिलकीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. यातूनच साठे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी व टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा उदय झाला. बघता बघता हजारोंच्या संख्येने लॅप्रोस्कोपीच्या साहाय्याने छोटी-मोठी ऑपरेशन केली आहेत.

‘ती’ लक्षणीय घटना निर्णायक वळण देणारी…
वडिलांच्याच नावलौकिकास शोभेल, असेच काम डॉ. रवींद्र साठे व डॉ. विद्या साठे यांनी पुढे केले असून 1986 पासून वडिलांचा वैद्यकीय सेवेचा वसा सुरू ठेवला. डॉ. रवींद्र साठे हे जनरल सर्जन (गोल्ड मेडलिस्ट) व डॉ. विद्या साठे या स्त्रीरोगतज्ज्ञ एम.डी. (Obst and Gyn) आहेत. दोघांनीही आपआपल्या क्षेत्रात लवकरच जम बसवला. मात्र, काळाची गरज वेगळीच होती. म्हणून की काय, किंवा अपघातातून सुद्धा काहीवेळेस वेगळे संकेत मिळत असतात, तसाच एक अपघात नाही पण आप्तेष्टातील एक रुग्ण खूप पोट दुखते म्हणून दवाखान्यात आली. वैद्यकीय चाचणीअंती लक्षात आले की तिचा गर्भ हा गर्भनलिकेत होता. त्या ठिकाणी गर्भपात झालेला होता. तिची गर्भनलिका काढून टाकावी लागली. त्यावेळी एक स्त्री डॉक्‍टर म्हणून डॉ. विद्या साठे यांना दुःख झाले.

जर लॅप्रोस्कोपीचे तंत्रज्ञान वापरून ऑपरेशन केले असते तर तिची गर्भनलिका सुरक्षित राहिली असती व तिला परत नैसर्गिकरित्या गर्भ राहू शकला असता. पण आता तिला कृत्रिम गर्भधारणा करून घेण्याशिवाय पर्यायच राहिला नाही. येथूनच साठे हॉस्पिटलच्या टर्निंग पॉईंटला सुरुवात झाली. डॉ. रवींद्र साठे यांनी लॅप्रोस्कोपीचे तंत्रज्ञान आत्मसात करून घेतले. डॉ. विद्या साठे यांनी वंध्यत्व निवारणाचे प्रशिक्षण घेतले. आणि लॅप्रोस्कोपी, टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानाचा उगम झाला.
– डॉ. रवींद्र साठे

शब्दांकन : दत्ता कुकडे, दौंड

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.