महिला क्रिकेट नव्या युगाची नांदी

बीसीसीआयने तीन संघ तयार करत अमिरातीत महिलांची मिनी आयपीएल आयोजित करत चांगला संदेश दिला आहे. ही स्पर्धा बाल्यावस्थेत असली तरीही येत्या काळात त्याची व्याप्ती निश्‍चितच वाढणार आहे. त्यामुळे देशातील महिला क्रिकेटपटूंना आपले आंतरराष्ट्रीय वर्चस्व सिद्ध करण्याची नामी संधी मिळाली आहे. यंदा अमिरातीत येत्या 4 ते 9 नोव्हेंबर या खूपच कमी कालावधीत जरी ही स्पर्धा होत असली तरीही ती महिला क्रिकेटच्या नव्या युगाची नांदी ठरणार आहे.

प्रकारे पुरुषांच्या आयपीएल स्पर्धेने जग जिंकले तसेच महिलांच्या आयपीएलनेही जिंकावे, हीच अपेक्षा आहे. जगभरातील खेळाडू या स्पर्धेत खेळतील व आपली गुणवत्ता व कामगिरीही सिद्ध करतील याचा विश्‍वास आहेच; पण त्याचबरोबर भारतातील महिला क्रिकेट देखील संपूर्ण व्यावसायिक बनेल यात शंका नाही. पुरूष खेळाडूंप्रमाणे महिला खेळाडूंसाठीही आयपीएल असावी ही मागणी काही नवीन नाही. मात्र, त्यावेळी बीसीसीआयने नुकतेच महिला क्रिकेट आपल्या कक्षेत घेतले होते, त्यामुळे अशी स्पर्धा कितपत यशस्वी होईल याची खात्री देता येत नव्हती.

तसेच कोणतीही स्पर्धा आयोजित करायची असेल तर मुख्य प्रश्‍न असतो तो प्रायोजकांचा. त्यामुळे या स्पर्धेसाठी प्रायोजक पुढे आले तरच याचा विचार करता येईल, असे त्याचवेळी बीसीसीआयने स्पष्ट केले होते. मात्र, त्यानंतर पुलाखालून खूप पाणी वाहून गेले. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने बीसीसीआयची सूत्रे स्वीकारली व लगेचच महिलांच्या आयपीएलबाबत गांभीर्याने विचार करू, असे सांगितले व काही महिन्यांतच अशा स्पर्धेचे आयोजन प्रायोगिक तत्त्वावर करण्याची घोषणाही केली. हा निर्णय महिला क्रिकेटला प्रचंड मोठा दिलासा देणारा ठरला, यात वाद नाही. आजवर असे क्रिकेट सामने खेळवले जावेत ही मागणी अनेकांनी केली. शाळेत असताना आपण काटकोन किंवा त्रिकोण शिकतो मात्र, दृष्टीकोन शिकत नाही हेच आजवरच्या बीसीसीआयच्या भूमिकेतून दिसत होते. गांगुली आला आणि परिस्थिती पालटली.

खरेतर गेल्या 8 ते 10 वर्षांत भारतीय महिला क्रिकेट कमालीचे बदलले आहे. व्यावसायिक दृष्टीकोनही थोडाफार दिसू लागला आहे. केवळ आपल्या पालकांच्या कौतुकाचा विषय असलेले हे क्रिकेट जागतिक गौरवाचे ठरत गेले. मिताली राज, झुलन गोस्वामी, अंजूम चोप्रा यांनी सरस कामगिरी करूनही त्यांच्या काळात स्थैर्य नव्हते. मात्र, आजच्या काळात पाहिले तर, स्मृती मानधना, हरमनप्रीत सिंग, पूनम यादव, पूनम पाटील अशा खेळाडूंनी आपल्या गुणवत्तेची दखल जागतिक क्रिकेटला घ्यायला भाग पाडले व महिला क्रिकेटचे संपूर्ण चित्रच बदलून गेले.

पुरूषांच्या आयपीएलचे यंदा 13 वे वर्षे आहे. ही स्पर्धा जेव्हा सुरू झाली त्यावेळी त्याच्या यशाची खात्री बीसीसीआयलाही नव्हती. मात्र, या स्पर्धेने तुफान लोकप्रियता मिळवली व आज अशी परिस्थिती आहे की, जागतिक क्रिकेटमधील सर्वच संघांचे स्टार खेळाडू एकवेळ त्यांच्या देशाच्या संघाकडून खेळायला राजी होत नाहीत, तर सोन्याचे अंडे देणारी कोंबडी ठरत असलेल्या आयपीएलमध्ये खेळायला मात्र लगेच तयार होतात. यात योग्य की अयोग्य हा बाग अलाहिदा, पण केवळ गुणवत्तेला सिद्ध करण्याचे हे व्यासपीठ आहे म्हणून नव्हे, तर ज्या खेळाडूंची आर्थिक स्थिती कमकुवत आहे त्यांच्या परिस्थितीचा कायापालट करणारी ही स्पर्धा ठरली. त्यामुळेच पुरूष आयपीएलसह आता येत्या काळात महिलांचीही आयपीएलदेखील जग जिंकेल याची खात्री वाटते.देश परदेशातील अनेक खेळाडू आयपीएलमध्ये खेळताना दिसतात. त्यांची मैदानावरील तसेच मैदानाबाहेरील कामगिरी पाहूनच भारतातील नवोदित खेळाडूही प्रेरणा घेतात व भारतीय संघाचा सेकंड बेंच म्हणून नावारूपाला येत आहेत. हेच चित्र भारताच्या महिला संघाबाबतही घडेल व त्यावेळी महिलांची आयपीएलही लोकप्रिय होईल.

महिलांचे क्रिकेट बालावस्थेत होते, असे म्हणण्याचे कारण म्हणजे त्याची व्याप्ती केवळ शालेय, महाविद्यालयीन किंवा फार तर जिल्हा पातळीवरच होती. गेल्या काही वर्षांपासून मात्र, त्याचा कायापालट झाला. मिताली, मानधना यांच्यासारख्या स्टार बनलेल्या खेळाडूंकडे पाहून नवे चेहरेही भारताचे महिला क्रिकेट गाजवू लागले, हीच नव्या युगाची नांदी ठरली. आजचे चित्र खूपच बदलले आहे. कोणाच्या खिजगणतीतही नसलेले महिला क्रिकेट शालेय, महाविद्यालयीन, क्‍लब, जिल्हा, राज्य, विभागीय व राष्ट्रीय पातळीवरही यशस्वी ठरले. इतकेच नव्हे तर भारताच्या महिला संघाने बलाढ्य इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व दक्षिण आफ्रिका या देशांच्या संघांवर सातत्याने वर्चस्व राखले आहे. यालाच प्रगती म्हणतात.

14 वर्षांपूर्वी बीसीसीआयने महिला क्रिकेट संघटनेला आपल्या विस्तारात सामावून घेतले व तिथूनच महिला क्रिकेटच्या सबलतेचा प्रवास सुरू झाला. आज जसे भारतीय संघाचे स्टार खेळाडू आपल्या लोकप्रियतेची कक्षा रुंदावत आहेत, त्याच पाऊल वाटेवरून महिला क्रिकेटपटूंचाही प्रवास सुरू झाला आहे. आज मानधना किंवा हरमन यांच्यासारख्या स्टार महिला क्रिकेटपटू करोडो रुपयांचा करार मिळवत आहेत, यातच त्यांचे यश आधोरेखित होते. यंदा जी स्पर्धा सुपरनोव्हाज, वेलॉसीटी व ट्रायलब्रेझर या केवळ तीन संघातच होणार आहे, त्याची व्याप्ती वाढवणे आवश्‍यक आहे. पुरूषांच्या आयपीएलमध्ये जसे आठ संघ आहेत तसेच आठ संघ महिलांच्या आयपीएलमध्येही तयार केले जावेत, तरच देशपरदेशातील सर्व होतकरू महिला क्रिकेटपटूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची सुवर्णसंधी मिळेल.

भारताचा महिला संघ परदेशातही सातत्याने यश मिळवत आहे. तेथील वातावरण, परिस्थिती या सर्व गोष्टींवर यशस्वी मात करत त्यांची विजयी घोडदौड सुरू आहे. आता महिलांच्या आयपीएलची कक्षा रुंदावली तर येत्या काळात भारताच्या क्रिकेटलाही “स्काय इज द लिमिट’ अशी स्थिती तयार झालेली दिसेल. अमिरातीत सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेत एक समीक्षक किंवा समालोचक म्हणून देशपरदेशातील स्टार महिला क्रिकेटपटू सामन्यांचे विवेचन करताना दिसतात. हे चित्र खूप काही सांगून जाते. क्रिकेट हा खेळ पुरुषांचीच मक्‍तेदारी असलेला खेळ आहे वगैरे बाजारगप्पा मारणाऱ्या सो-कॉल्ड समीक्षकांना चपराक बसवणारे हे महिला क्रिकेटचे नवे युग अवतरत आहे आणि आपण सगळेच या क्षणांचे साक्षीदार बनणार आहोत.

क्रीडारंग
अमित डोंगरे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.