मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा चेरापुंजीमधील एक कथित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावरुन राज्यात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीटरवरुन नाना पटोले एका महिलेसोबत चेरापुंजी येथे असल्याचा दावा करणारा व्हिडीओ शेअर करत त्यांच्यावर टीका केली होती. दरम्यान, याच प्रकरणावरून आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
२० जुलै रोजी मुंबईमधील पत्रकार परिषदेमध्ये चित्रा वाघ यांनी, “नाना पटोलेंचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर मला धक्काच बसला. ‘अशा’ पीडितांनी समोर यावं योग्य ती कारवाई होईल,” असे म्हटले होते. तसेच पुढे बोलताना,“सकाळपासून हा व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये नाना पटोले एका महिलेसोबत आहेत. जोपर्यंत सार्वजनिक जीवनामध्ये एखादी गोष्ट येत नाही ती खासगी असते. मात्र जेव्हा ती सार्वजनिक जीवनामध्ये येते तेव्हा लोकप्रितिनिधी म्हणून त्यांना विचारलं पाहिजे. त्यानुसार मी विचारलंय ट्वीट करुन त्यांना,” असे चित्रा वाघ म्हणाल्या. त्यांनी “काय नाना…..तुम्ही पण झाडी डोंगार आणि हाटीलातं” या कॅप्शनसहीत हा ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल’ या गाण्यासहीत एडीटींग केलेला व्हिडीओ ट्वीट केला होता.
पुढे बोलताना चाकणकर यांनी, “संबंधित पिडिता राज्य महिला आयोगाकडे तक्रार करतात तेव्हा आम्ही त्याची दखल घेतो. राज्य महिला आयोगाकडे याबाबत कोणतीही तक्रार आलेली नाहीय,” असे सांगितले. पुढे बोलताना,“तक्रारी आल्यानंतर त्याची शहानिशा करुन संबंधित पोलिसांना कारवाई करा म्हणून सूचना देतो. राज्य महिला आयोग हे घटनात्मक दर्जाचा विभाग आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीवर विश्वास न ठेवता आमच्याकडे आलेली तक्रार, त्यासंबंधित पुरावे यासंदर्भात पोलीस विभागाला सूचना देत असतो,” असे आयोगाच्या कार्यपद्धतीबद्दल बोलताना चाकणकर म्हणाल्या.
दरम्यान,चित्रा वाघ यांच्या पत्रकार परिषदेनंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना नाना पटोलेंनी, “हे सगळं प्रकरण आमचं मिडीया सेल बघतय मी सध्या पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहे. आपल्या देशात राजकारणाची पातळी खाली उतरलेली दिसतेय त्याचा हा परिणाम आहे. लोकांसाठी काम करणाऱ्या लोकांना कसं बदनाम करता येईल असे प्रयत्न सुरु आहेत. यासंदर्भात आमची लीगल टीम कारवाई करत आहे. त्यांच्याबद्दल (चित्रा वाघ यांच्याबद्दल) मला काही बोलायचं नाहीय. खरं काय ते समोर येईल,” असे म्हटले होते.