नवी दिल्ली -महिला आशिया चषक फुटबॉल स्पर्धेचे सामने मुंबई आणि पुण्यात खेळविण्यात येणार आहे. ही स्पर्धा पुढील वर्षी आयोजित करण्यात आली आहे.
प्रवासाच्या वेळेची बचत आणि जैवसुरक्षित वातावरणाच्या उद्देशाने भुवनेश्वर आणि अहमदाबादला वगळले आहे.
महिला आशिया चषक स्पर्धा 20 जानेवारी ते 6 फेब्रुवारी, 2022 या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेसाठी मुंबईच्या अंधेरी क्रीडा संकुलातील दी मुंबई फुटबॉल एरिना,
नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम आणि पुण्याच्या बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुल या नव्या तीन ठिकाणांवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
करोना साथीमुळे निर्माण झालेल्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे, असे आशियाई फुटबॉल महासंघाने म्हटले आहे. याआधी ही स्पर्धा ओडिशा आणि गुजरातमध्ये होणार होती.
दरम्यान, यजमान भारतासह जपान, ऑस्ट्रेलिया आणि चीन यांचे स्पर्धेतील स्थान निश्चित झाले आहे. परंतु उर्वरित आठ संघांसाठी पात्रता सामने होणार आहेत.