डंबुला – भारत आणि श्रीलंका रविवारी महिला आशियाई करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत आमने सामने येतील. भारताने आतापर्यंत सातवेळा आशियाई करंडक स्पर्धा जिंकली आहे. यंदा हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वातील टीम इंडियाचा आठव्यांदा विजेतेपद मिळवण्याचा प्रयत्न असेल. तर, स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या श्रीलंकेचा घरच्या मैदानावर विजेतेपद मिळवून इतिहास रचण्याचा प्रयत्न असेल. भारताने उपांत्य सामन्यात बांगलादेशचा तर श्रीलंकेने पाकिस्तानचा पराभव करताना अंतिम फेरी गाठलेली आहे. भारतीय महिला संघाची ही या स्पर्धेची नववी अंतिम फेरी ठरली आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील महिला आशिया चषकाचा अंतिम सामना आज (रविवार, 28 जुलै 2024) श्रीलंकेतील डंबुला आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. भारत आणि श्रीलंका यांच्यातील हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होईल. सामन्याचे लाईव्ह कव्हरेज स्टार स्पोर्ट्स नेटवर्क या चॅनलवर तर डिस्ने + हॉटस्टार ॲपवरही ऑनलाइन पाहता येईल.
जेतेपदासाठी होणारी लढत चुरशीची होणार यात शंका नाही. कारण दोन्ही संघांनी या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. भारताने साखळी फेरीत पाकिस्तान, संयुक्त अरब अमिराती, नेपाळ आणि उपांत्य फेरीत बांगलादेशला पराभूत केलं. दुसरीकडे श्रीलंकेने बांग्लादेश, मलेशिया, थायलंड आणि उपांत्य फेरीत पाकिस्तानला पराभूत केलं आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात कोण वरचढ ठरणार याची उत्सुकता आहे.
भारत आणि श्रीलंका हे 24 वेळा टी-20 सामन्यात आमनेसामने आले आहेत. या सामन्यात भारताची बाजू वरचढ राहिली आहे. भारताने 19, तर श्रीलंकेने 4 सामने जिंकले आहेत. तर एक सामना निकालाविना संपला. त्यामुळे भारताचं पारडं जरी जड असलं तरी श्रीलंकेला कमी समजणं महागात पडू शकते. चमिरा अट्टापट्टू जबरदस्त फॉर्मात आहे. तिने आतापर्यंत 243 धावा केल्या आहेत पण तिच्याशिवाय श्रीलंकेच्या इतर कोणत्याही फलंदाजाने 100 धावा पूर्ण केल्या नाहीत.