एचसीएल टेकच्या अध्यक्षपदी रोशनी नाडर
नवी दिल्ली – नोएडास्थित शिव नाडर यांच्या प्रयत्नाने सुरू झालेल्या एचसीएल टेक कंपनीच्या अध्यक्षपदी त्यांच्या कन्या रोशनी नाडर यांची निवड कंपनीच्या संचालक मंडळाने केली आहे.
भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीपैकी एक असलेले शिव नाडर यांनी अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची इच्छा व्यक्त केली. संचालक मंडळाने त्यांची विनंती मान्य करून त्या जागेवर रोशनी नाडर यांची निवड केली आहे. मात्र, शिव नाडर हे व्यवस्थापकीय संचालक म्हणून आगामी काळात कार्यरत राहणार आहेत. 38 वर्षांच्या रोशनी या भारतातील सर्वाधिक श्रीमंत महिला आहेत. 28 व्या वर्षांपासून त्या कंपनीत कार्यरत आहेत. रोशनी यांची संपत्ती 36 हजार 800 कोटी रुपये असल्याचे बोलले जाते. दरम्यान, अमेरिकेने एचवन- बी व्हिसाबाबत जो निर्णय घेतला आहे, त्याचा एचसीएल टेक कंपनीवर अत्यल्प परिणाम झाला असल्याचे या कंपनीने चमकदार ताळेबंद जाहीर केल्यानंतर सांगितले. या निर्णयाचा अमेरिकेच्या कंपन्यांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
अमेरिकेच्या प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे, ही दुर्दैवाची बाब असल्याचे कंपनीने म्हटले आहे. अमेरिकेमध्ये भारतीय कंपन्या कार्यरत आहेत. योग्य मनुष्यबळ अमेरिकेत उपलब्ध झाल्यानंतर आम्हाला भारतातून कर्मचारी घेऊन जाण्याची गरज नाही. मात्र, अमेरिकन प्रशासनाने घेतलेल्या निर्णयामुळे अमेरिकेतील कामावर परिणाम होत आहे.
दरम्यान, या कंपनीने दुसऱ्या तिमाहीचा चमकदार ताळेबंद जाहीर केला. लॉकडाऊनच्या काळातही भारतीय माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी उत्तम कामगिरी केली आहे. एचसीएल टेक कंपनीला पहिल्या तिमाहीत झालेला नफा 31.7 टक्क्यांनी वाढून 2,925 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत कंपनीला 2,220 कोटी रुपयांचा नफा झाला होता. कंपनीचा महसूल 9 टक्क्यांनी वाढून 17,841 कोटी रुपये झाला आहे. कंपनीने आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून मनुष्यबळ विकसित केले आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात कंपनीच्या कामकाजावर फारसा परिणाम झाला नसल्याचे कंपनीने सांगितले.